हुमायून कबीर नव्हे तर ममता बॅनर्जीकडून बाबरीची पायाभरणी!

    दिनांक :08-Dec-2025
Total Views |
कोलकाता,
Mamata lays foundation stone of Babri भाजपने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बाबरी मशिदीची पायाभरणी हुमायून कबीर यांनी नव्हे, तर प्रत्यक्षात ममता बॅनर्जी यांच्या निर्देशानुसारच झाली. भाजपने प्रश्न उपस्थित केला आहे की मुख्यमंत्री स्वतः घेतलेल्या निर्णयावरून आता आपल्या पक्षातील नेते आणि खासदारांना त्याविरोधात बोलण्यास कसे भाग पाडत आहेत.
 
 

babari and mamata 
तृणमूल काँग्रेसने मशिदीची पायाभरणी केल्याप्रकरणी आमदार हुमायून कबीर यांना निलंबित केले आहे. तथापि, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी हा निर्णय फसवा असल्याचा आरोप करत म्हटले की, "कबीर यांनी काही केले नाही; हे सर्व ममता बॅनर्जी यांच्या सूचनेनुसार झाले. आता त्या नाटक करत आहेत आणि आपल्या नेत्यांना उलट विधान करायला लावत आहेत." सिंह यांनी असा दावा केला की बंगालमध्ये हिंदू–मुस्लिम विभाजन वाढवण्यासाठी ही कृती ‘छुपा अजेंडा’ म्हणून राबवली गेली असून ती केवळ बंगालपुरती मर्यादित नसून सुविचारित राष्ट्रीय रणनीतीचा भाग असल्याचेही त्यांनी म्हटले. ममता बॅनर्जी यांनी याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
 
 
दरम्यान, संसदेत होणाऱ्या वंदे मातरम्‌च्या चर्चेबद्दल भाष्य करताना गिरिराज सिंह म्हणाले, भारताच्या लोकशाहीच्या सर्वोच्च मंचावर यावर चर्चा होणार नसेल, तर मग कुठे होणार? वंदे मातरम्‌ची १५० वी जयंती साजरी होत आहे. हे स्वातंत्र्याचे गीत बंगालच्या मातीतून जन्मले आहे आणि त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. ते भारताचा वारसा आहे. तृणमूल काँग्रेसमधून निलंबनानंतर हुमायून कबीर आता स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. ते २२ डिसेंबर रोजी हा मोठा निर्णय जाहीर करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मशिदीच्या पायाभरणीसंदर्भात मुख्यमंत्री बॅनर्जी नाराज असल्याचीही चर्चा होती, मात्र पक्षाकडून याबाबत अधिकृत भूमिका अद्याप मांडलेली नाही.