गंगा आणि व्होल्गाचा संगम

    दिनांक :08-Dec-2025
Total Views |
 
 अग्रलेख  
 
putin welcome गेल्या गुरुवारी सायंकाळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांचे विमान पालम विमानतळावर उतरताच क्रेमलिनला आश्चर्याचा धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रोटोकॉल तोडून पुतिन यांच्या स्वागतासाठी गेले होते. पुतिन यांच्या कार्यालयालाही याची जाणीव नव्हती. आमचे एवढे भव्य स्वागत होईल आणि स्वत: पंतप्रधान मोदी स्वागताला येतील याची कल्पना आम्हाला नव्हती, अशी प्रतिक्रिया क्रेमलिनने दिली. तसेही आश्चर्याचा धक्का देण्यात मोदी पटाईत आहेत. त्यांनी आतापर्यंत एवढे धक्के दिले आहेत की अनेकांची त्रेधातिरपीट उडाल्याचे कित्येक अनुभव आहेत. आज जगाचे थेट दोन गट पडले आहेत. एक गट अमेरिकेच्या तर दुसरा रशियाच्या प्रभावाखाली आहे. नाटो गटातील देश जसे थेट अमेरिकेच्या प्रभावाखाली काम करतात, तसा शिक्का भारताच्या माथी नाही. मॉस्को आणि नवी दिल्ली यांचे संबंध सात दशकांचे असले तरी जागतिक राजकारणात भारताचे धोरण कायम तटस्थ राहिले आहे.
 

putin welcome 
 
 
मानवीय आधार सोडला तर राजकीय अथवा लष्करीदृष्ट्या भारताने कधीही कुण्या एका देशाची अथवा जागतिक संघटनेची तळी उचललेली नाही. रशिया आपला सर्वाधिक जवळचा मित्र देश आणि हितचिंतक असला तरी आवश्यक वाटले तेव्हा त्याला कानपिचक्या द्यायलाही आपण मागेपुढे पाहिले नाही. पुतिन भारत-रशिया द्विपक्षीय परिषदेसाठी दिल्लीला आलेे होते त्यामुळे त्याकडे जगाचे लक्ष लागून होते. कारण, अमेरिकेने थेट भारतविरोधी भूमिका घेत 50 टक्के व्यापार शुल्क लादले आणि रशियाकडून तेल विकत घेऊ नये म्हणून प्रचंड दबाव आणला.
गेल्या जुलै-ऑगस्टमध्ये 50 टक्के व्यापार शुल्क आकारूनही भारताने त्याला शांतपणे तोंड देत एकीकडे वॉशिंग्टनला चर्चेच्या टेबलावर येण्यास भाग पाडले तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांचे मानमर्दन केले. भारत व्यापार शुल्क कमी करावे म्हणून विनवणी करेल, या अपेक्षेत ट्रम्प होते; पण मोदी यांनी वाढीव शुल्काचा सामना करीत देशाची मान खाली जाईल, असे काहीही केले नाही. ही सर्व पृष्ठभूमी पाहता पुतिन यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरला. भौगोलिकदृष्ट्या जगातील सर्वांत मोठा असलेला देश रशिया आणि सर्वांत मोठा लोकशाहीवादी देश भारत यांच्यातील संबंध आणि भागीदारी ही दीर्घकालीन असून ती शांतता, स्थिरता आणि परस्पर विश्वास यावर आधारित आहे. विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रप्रमुख हे कर्मठ आणि देशहिताला प्राधान्य देणारे आहेत. युक्रेन युद्ध आणि अमेरिकेच्या आडमुठ्या व्यापारी धोरणामुळे जागतिक व्यापारावर नकारात्मक परिणाम झाले. याचा फटका विशाल लोकसंख्या असलेल्या भारताला बसणे स्वाभाविक होते. युरोपातील ग्रीससारख्या छोट्या देशांमध्ये तर ब्रेडसाठी रांगा लावण्याची वेळ नागरिकांवर आली. भारताची ऊर्जाविषयक गरज मोठी आहे. ऊर्जा साधनांच्या पुरवठ्यात बाधा येऊ नये म्हणून भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात सुरू केली. यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर जवळपास स्थिर राहिले. आतापर्यंत आखाती देश कच्च्या तेलाचा उपसा कमी करून आर्थिक फायदा करून घेत होते. परंतु, युक्रेन युद्धानंतर परिस्थिती बदलली. अमेरिकेच्या आर्थिक निर्बंध लादण्याच्या इशाèयानंतरही चीन आणि तुर्कस्थाननंतर रशियाकडून तेल खरेदी करण्यात आजही भारत तिसèया क्रमांकावर आहे.putin welcome गेल्या ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेने रशियाच्या लुकोईल आणि रोस्नेफ्ट या सर्वांत मोठ्या तेल उत्पादक कंपन्यांवर निर्बंध लादल्याने भारताला नोव्हेंबर महिन्यापासून तेल आयातीत कपात करावी लागली. पण, पुरवठा साखळी बाधित होऊ नये व ऊर्जा सुरक्षा कायम ठेवण्यासाठी भारताने अमेरिका, आखाती देश आणि आफ्रिका खंडातील देशांकडून आयात वाढविली. एका अर्थाने व्यापाराच्या संदर्भात भारताने अमेरिका आणि रशिया या दोघांना एकाच पारड्यात मोजले. भारताची ही भूमिका म्हणजे एक प्रकारे रशिया आणि पश्चिम देशांमधील संवादसेतूसारखी आहे. कोणत्याही एका गटाकडे झुकण्याऐवजी दिल्ली संतुलन राखत आहे. हीच शांत प्रबुद्ध भूमिका कौतुकास पात्र ठरणारी आहे.
पुतिन यांचा दौरा हा भारतासोबतच्या ऐतिहासिक मैत्रीचे पुनरुज्जीवन करणारा, ऊर्जा-अणुऊर्जा-संरक्षण क्षेत्रांत 2030 पर्यंतच्या नव्या आर्थिक सहकार्याची पायाभरणी आणि जागतिक संघर्षाच्या काळात शांततेचा सांस्कृतिक संदेश देणारी गीता हा कूटनीतीचा विषय ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना रशियन भाषेत भाषांतर केलेली गीता भेट स्वरूपात दिली आहे. याचा अर्थ फार गहन आहे. रशिया गेल्या तीन वर्षांपासून युद्ध परिस्थितीशी झुंजत आहे. युक्रेनच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिका आणि नाटोचे सदस्य असलेले युरोपियन देश रशियाला जखमी करण्याचे प्रयत्न करीत आहेत. पण, पुतिन कुठल्याही परिस्थितीत माघार घेण्यास तयार नाहीत. आज युक्रेनचा जवळपास 20 टक्के भूभाग रशियाच्या ताब्यात आला आहे. या भूभागावरील हक्क सोडला तरच युद्धबंदीची तयारी पुतिन यांनी दर्शविली आहे. युद्ध सुरू असतानाही पुतिन यांनी दिल्लीचा दौरा करीत भारत जागतिक राजकारणात रशियासाठी किती महत्त्वाचा भागीदार आणि विश्वासू देश आहे हे दाखवून दिले आहे. जागतिक राजकारणात रशिया सध्या एकटा पडला आहे. अशा संकटाच्या काळात शंभर कौरव आणि कौरव सेनेने घेरले असले तरी भगवान श्रीकृष्ण यांच्यासारखा सखा पांडवांच्या पाठीशी आहे, असा संदेशच मोदी यांनी पुतिन यांना गीता भेट देऊन दिला आहे. सोबतच या माध्यमातून मोदी यांनी युद्धमैदानावर शत्रूशी कसे वागावे याचे स्मरणच पुतिन यांना करून दिले आहे, असे म्हणावे लागेल. गीता भेट देऊन त्यातील मैत्री भाव या आध्यात्मिक संदेशाचा विचार करण्याची आणि संघर्षाऐवजी संवादावर भर देण्याची आवश्यकता असल्याचा संदेशच दिला आहे. सांस्कृतिक प्रतीकांचा वापर करून पंतप्रधान मोदी वेगळ्या प्रकारची कूटनीती राबवीत असल्याचे या माध्यमातून दिसून आले आहे.
व्यापार आणि ऊर्जा हा 23 व्या शिखर परिषदेचा प्रमुख अजेंडा होता. येत्या पाच वर्षांमध्ये 100 अब्ज डॉलर्स व्यापाराचे लक्ष्य ठेवण्यात आले. सध्या हा आकडा 70 अब्ज डॉलर्स एवढा आहे. तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात करार करून रशियाने दीर्घकालीन ऊर्जा व्यापार वाढविण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.putin welcome भारतात वाहतूक आणि सेवा क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. याचा लाभ घेण्यासाठी रशियन गुंतवणूकदार उत्सुक असल्याचे पुतिन यांनी म्हटले आहे. भारत स्वस्त आणि कार्यक्षम इलेक्ट्रिक वाहने, दुचाकी वाहने आणि सीएनजी वाहतूक क्षेत्रात आघाडीवर आहे, तर रशियाकडे प्रगत तंत्रज्ञान आहे. दोन्ही देश जर एकत्र आले तर वाहन आणि सेवा क्षेत्रात मोठी क्रांती घडून या संदर्भातील इतर देशांच्या गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात. मोदी यांनी रशियाच्या मदतीने युरेशियन इकॉनॉमी युनियनशी मुक्त व्यापार करार करण्यासाठी बोलणी सुरू केली आहे. रशिया, आर्मेनिया, बेलारूस, कझाकस्तान, किरगिझीस्तान या पाच देशांचा या युनियनमध्ये समावेश आहे. वाहतूक कॉरिडॉर हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मोदी-पुतिन यांनी चेन्नई-व्लादिवोस्तोक आणि नॉर्दन सी रूट या मार्गावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यास सहमती दर्शविली आहे. या दौèयात पुतिन भारताला एस-400, एस-500 या अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आणि सुखोई-57 ही लढाऊ विमाने विकण्याचा सौदा करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण, संरक्षण सामुग्री विषयक सौद्यांसाठी सध्याची परिस्थिती अनुकूल नाही. युद्धापेक्षा शांततेला महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे व्होल्गा लाल न होता शीतल राहूनच पवित्र गंगेप्रमाणे वाहत राहावी आणि यातच सर्वांचे भले आहे. त्यामुळे या मैत्री पर्वाचे आपण स्वागत केले पाहिजे.