इंडिगोचे संकट कायम; ३५०हून अधिक उड्डाणे आजही रद्द

    दिनांक :08-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
More than 350 IndiGo flights cancelled इंडिगोचे कामकाजातील संकट सोमवारीही कायम राहिले असून, देशातील प्रमुख विमानतळांवर उड्डाणे रद्द होण्याचा आणि विलंबाचा मोठा परिणाम दिसून आला. दिल्ली आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये इंडिगोची विमानयात्रा विस्कळीत झाली आहे. वाढत्या अडचणी पाहता दिल्ली विमानतळाने सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी प्रवाशांना सल्ला जारी करून घराबाहेर पडण्यापूर्वी उड्डाणांची अद्ययावत स्थिती तपासण्याचे आवाहन केले. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत देशभरात इंडिगोची ३५० हून अधिक उड्डाणे रद्द झाली.
 

संग्रहित फोटो\

संग्रहित फोटो 
 
अहमदाबाद विमानतळावर १८, बेंगळुरू येथे १२७, हैदराबादमध्ये ७७ तर दिल्लीमध्ये तब्बल १३४ उड्डाणे रद्द करण्यात आली. चेन्नई, अहमदाबाद आणि आसामच्या विमानतळांवर प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवडाभरात देशभरात सुमारे ४,००० उड्डाणे रद्द झाल्याने हवाई वाहतूक गंभीरपणे विस्कळीत झाली आहे आणि सरकारी हस्तक्षेपानंतरही परिस्थिती अद्याप सुरळीत झालेली नाही. दरम्यान, ऑपरेशनल संकटावरून नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) इंडिगोला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. नवीन एफडीटीएल नियमांचा अंमल करण्यात झालेल्या त्रुटींमुळे संपूर्ण गोंधळ उडाल्याचे डीजीसीएने नमूद केले. एअरलाइनने नोटीसला उत्तर देण्यासाठी एक दिवसाचा अतिरिक्त अवधी मागितला असून, सरकारनेही संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती नेमली आहे. इंडिगोने ऑक्टोबरपर्यंत नियमन अंमलबजावणीसाठी आवश्यक पावले उचलली नाहीत का, याचीही तपासणी सुरू आहे.