वर्धा,
Pankaj Bhoyar मागासवर्गीय घटकातील मुला-मुलींना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होत आहे. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मुले व मुली शिक्षणासाठी शहरात येतात. परंतु, निवासाची व्यवस्था नसल्याने त्यांची कुचंबना होते. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे वर्धेतील महादेवपुरा, नालवाडी येथे मुलींसाठी दोन तसेच सावंगी येथे मुलांसाठी एका वसतिगृहाची निर्मिती होणार आहे. यासाठी शासनाने ७४ कोटी १२ लाख ८८ हजारांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सुविधा नसल्याने जिल्हा मुख्यालयी शिक्षणासाठी ग्रामीण भागातील मागासवर्गीय घटकातील मुले व मुली मोठ्या प्रमाणात येतात. मात्र, शासकीय वसतिगृह नसल्याने या विद्यार्थ्यांना निवासाची व्यवस्था करताना अनेक अडचणी येतात. शहरातील भाडे परवडणारे नसल्याने अनेक मुले व मुली दररोज गावावरून ये-जा करीत असतात. मात्र, वेळेवर बसची सुविधा नसल्याने त्यांना तासन्तास ताटकळत राहावे लागते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.या दोन्ही वसतिगृहासांठी ४९ कोटी ७४ लाख ५२ हजारांची तरतूद करण्यात आली आहे. महादेवपुरा येथे निर्माण होणार्या वसतिगृहावर २४ कोटी ९० लाख ३६ हजार रुपये खर्च होणार आहे. या वसतिगृहात मान्य विद्यार्थी संख्या ७५ असून ती १७५ पर्यंत वाढविण्याचे प्रस्तावित आहे. २५० मुलींची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे. नालवाडी येथे वसतिगृहासाठी २४ कोटी ८४ लाख १६ हजार रुपयांची तरतूद करण्यात असून या वसतिगृहाची मान्य संख्या १०० असून ती १५० ने वाढविण्याचे प्रस्तावित आहे. या वसतिगृहात देखील २५० मुलींना निवासाची व्यवस्था राहणार आहे.
सावंगी येथील मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थी येत असतात. त्यांच्या निवासाची व्यवस्था व्हावी, यासाठी या परिसरात मुलांचे वसतिगृह निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी २४ कोटी ३८ लाख ३६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या वसतिगृहाची प्रवेश क्षमता २५० विद्यार्थी राहणार आहे.