'या' शेतकरी नेत्याला १३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

    दिनांक :08-Dec-2025
Total Views |
तामिळनाडू,
P.R. Pandian Selvaraj तामिळनाडूच्या शेतकरी संघटनांच्या सर्वसमन्वय समितीचे अध्यक्ष पी. आर. पांडियन आणि माजी पंचायत नेते सेल्वराज यांना जलदगती न्यायालयाने २०१५ मधील आंदोलनात ओएनजीसीच्या मालमत्तांचे नुकसान केल्याच्या आरोपात १३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच पी. आर. पांडियन यांना १३ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
 

P.R. Pandian Selvaraj  
सत्र न्यायाधीश जी. सरथराज, बी.एल. यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला असून, या प्रकरणात विक्कीरापांडियम पोलिस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सरकारी वकिलांच्या माहितीनुसार, पी. आर. पांडियन, सेल्वराज आणि अन्य २२ जणांचा करियमंगलम गावात २०१५ मध्ये झालेल्या आंदोलनात सहभाग होता. या आंदोलनात त्यांनी ओएनजीसीच्या परिसरातील प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शविला होता.अंदोलनादरम्यान झालेल्या परिस्थितीत ओएनजीसीच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांविरोधात ठेवण्यात आला होता. न्यायालयाने पुराव्यांवरून पी. आर. पांडियन आणि सेल्वराज यांना १३ वर्षे आणि अतिरिक्त तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली, तर उर्वरित २२ जणांना निर्दोष मुक्तता दिली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांडियन यांना तिरुचीनगर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येणार आहे.
या निकालामुळे शेतकरी चळवळीला मोठा धक्का बसल्याचे शेतकरी संघटना मानत आहेत. शेतकरी संघटनांनी या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सरकारविरोधात देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणी पुढील कृती ठरवण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) संघटनेने तातडीची बैठक बोलावली आहे.शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, ओएनजीसी प्रकल्पामुळे शेती आणि पर्यावरणाला धोका पोहोचू शकतो. या प्रकरणातील निकालामुळे तामिळनाडूतील आणि इतर राज्यांतील शेतकरी संघटनांमध्ये चिंता वाढली आहे. शेतकरी नेत्यांच्या कारावासामुळे आगामी आंदोलनांवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.