तळेगाव
Sachin Hole protest, तळेगाव पंचक्रोशीतील वाढते अवैध उत्खनन तसेच प्रशासनाच्या निष्क्रियते विरोधात येथील भाजपाचे नेते सचिन होले यांनी सोमवार ९ रोजी स्वतःची शोकसभा घेण्याची घोषणा केली. त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत हे अनोखे आंदोलन जाहीर केले.तळेगाव परिसरात काही व्यतींचीच प्रशासन पाठराखण करत आहे. त्याच व्यतींनी मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू केले आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी केल्या. मात्र, त्यावर ठोस कारवाई झाली नाही. उलट साध्या ट्रॅटरवाल्यांवर कडक कारवाई होते. पण, मोठ्या ठेकेदारांना कोणी हातही लावत नसल्याची खंत त्यांनी व्यत केली.
आपण पक्षाच्या कामानिमित्त आर्वी येथे असताना गावकर्यांनी उत्खननाची माहिती दिली. त्या वेळी त्या भागात प्रशासनाकडून कोणतीही परवानगी नव्हती तरी मोठ्या प्रमाणावर मुरूम खोदकाम सुरू होते. आपण तत्काळ अधिकार्यांशी संपर्क साधून माहिती दिली. मात्र त्यानंतरही उत्खनन थांबवण्यासाठी योग्य ती कारवाई झाली नाही. ज्या तक्रारीवर गोपनीय चौकशी होणे आवश्यक होते ती तक्रार समाजात फिरवण्यात आली. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाल्याचा आरोप होले यांनी केला.या संदर्भात आपल्या कार्यकर्त्यांना फोन करून धमकावले जात आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील परिस्थिती आणि प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत आंदोलनाच्या रूपात स्वतःची शोकसभा घेण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.