गिलच्या पुनरागमनामुळे संजूची जागा धोक्यात!

    दिनांक :08-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Sanju's place in danger due to Gill भारत–दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडिया भुवनेश्वरमध्ये दाखल झाली असून कटक येथील बाराबती स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सामन्याच्या तयारीला वेग आला आहे. याचदरम्यान संघासाठी सर्वात मोठा दिलासा म्हणजे शुभमन गिलच्या फिटनेसविषयी आलेली सकारात्मक बातमी. मानेच्या दुखापतीमुळे कसोटी आणि एकदिवसीय मालिकेबाहेर गेलेला गिल आता पूर्णपणे तंदुरुस्त असून नेटमध्ये परतण्यास तयार आहे. सोमवारी भुवनेश्वरला पोहोचलेला गिल सरावाला सुरुवात करणार आहे.
 
 
sanju and gill
 
 
भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही गिलच्या फिटनेसला दुजोरा देत तो लगेच खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. गंभीर यांच्या मते, गिल सलामीसाठी सज्ज आहे आणि त्यामुळेच त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. कोलकाता कसोटीत दुखापत झाल्यानंतर गिलने बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसनाचा कालावधी घालवला. वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली त्याने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सत्रे पूर्ण केल्यानंतर त्याला ग्रीन सिग्नल देण्यात आला. गिलच्या पुनरागमनामुळे मात्र संघ रचनेत नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेषतः संजू सॅमसनची स्थिती पुन्हा एकदा कठीण होण्याची शक्यता आहे.
 
 
गिलला अभिषेक शर्मासोबत सलामीवीर म्हणून उतरवले जाणार असल्यास मध्यक्रमातील जागांच्या फेरबदलात संजूसाठी जागा मिळणे कठीण होऊ शकते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले होते आणि त्या ठिकाणी जितेश शर्माने विकेटकीपिंग आणि फिनिशरची भूमिका सांभाळली होती. संजू सॅमसनने यापूर्वी भारतीय संघासाठी सलामीवीर म्हणून अनेक महत्त्वाच्या खेळी केल्या असल्या तरी गिलच्या पुनरागमनामुळे स्पर्धा वाढली असून आगामी सामन्यांत संघ व्यवस्थापन कोणावर विश्वास ठेवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.