नागपूर
Sant Jagnade Maharaj ITI, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामांतरण ‘संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे करण्यात आले व संस्थेच्या कोनशिलेचे अनावरणही त्यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितांना संबोधित करताना, महाराष्ट्राची ओळख भक्ती आणि वारकरी संप्रदायामुळे निर्माण झाली आहे.
वारकरी संप्रदायाने जाती-पातीचे भेद दूर करून समाज एकत्र आणला. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रसार जनमानसात पोहोचवण्याचे महान कार्य संताजी जगनाडे महाराजांनी केले असल्याने तंत्रनिकेतन संस्थांना महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. कृष्णा खोपडे, आ. रामदास तडस, आ. शेखर सावरबांधे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना संविधानाचे मंदिर उभारणे, नवे कोर्सेस, आधुनिक तंत्रज्ञान आणि मोठ्या उद्योगसंस्थांशी सामंजस्य यामुळे उद्योगांना आवश्यक कौशल्ययुक्त मनुष्यबळ तयार होईल. कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी, प्राचार्य, प्रादेशिक अधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.