मोठी बातमी...महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड झोन नक्षलमुक्त!

    दिनांक :08-Dec-2025
Total Views |
रायपूर,
Surrender of Naxalite Ramdher Majji छत्तीसगडमध्ये नक्षलवादाविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. दुर्ग विभागातील खैरागड जिल्ह्यातील बकरकट्टा येथे आज सकाळी केंद्रीय समिती सदस्य रामधेर मज्जी यांच्यासह १२ नक्षलवाद्यांनी शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. या प्रकरणानंतर महाराष्ट्र–मध्य प्रदेश–छत्तीसगड (एमएमसी) झोन पूर्णपणे नक्षलमुक्त झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये सहा महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. रामधेर मज्जी हा नक्षलवाद्यांच्या संघटनेतील अत्यंत कुख्यात आणि महत्वाचा कमांडर मानला जात होता. हिदमानंतर छत्तीसगडमधील दुसऱ्या क्रमांकाचा नेता म्हणून त्याची ओळख होती. त्याच्यावर एक कोटी रुपयांचे जाहीर इनाम होते. त्याच्या आणि त्याच्या गटाच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी संघटनेला मोठा धक्का बसल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे.
 
 
 naxal mukt

मिळालेल्या माहितीनुसार, खैरागड जिल्ह्यातील कुम्ही गावाजवळील बकरकट्टा पोलिस ठाण्यात या सर्व नक्षलवाद्यांनी आज सकाळी स्वतःहून उपस्थित राहून शस्त्रे खाली ठेवली. हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये सीसीएम, डीव्हीसीएम, एसीएम आणि पीएम या स्तरांवरील सदस्यांचा समावेश असून, त्यांच्या विरोधात एमएमसी झोनमधील विविध पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. रामधेर मज्जीसह आत्मसमर्पण करणारे नक्षलवादी विविध आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज होते—यात एके-४७, इन्सास, एसएलआर आणि ३०३ रायफल्सचाही समावेश आहे. काही सदस्यांकडे शस्त्रे नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले.

 

काही दिवसांपूर्वीच एमएमसी झोनचे प्रवक्ते अनंत यांनीही आपल्या साथीदारांसह मध्य प्रदेश–महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील क्षेत्रात शरणागती पत्करली होती. त्यामुळे एमएमसी झोनमधील नक्षलवाद आता पूर्णपणे संपुष्टात येण्याच्या दिशेने गेला आहे, असे स्पष्टपणे दिसत आहे. छत्तीसगडमधून नक्षलवाद निर्मूलनाची अंतिम मुदत सरकारने मार्च २०२६ निश्चित केली आहे आणि आजचे हे आत्मसमर्पण त्या दिशेने झालेली निर्णायक पावले मानली जात आहेत.