हिवाळी अधिवेशनात तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची भाजपाची मागणी!

    दिनांक :08-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Suspend Tukaram Mundhe महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये सुरुवात झाली असताना, राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात मोठा राजकीय वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपाचे आमदार मुंढे यांना निलंबित करण्याची अधिकृत मागणी सभागृहात मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी अधिकार नसतानाही स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार स्वतःकडे घेतला आणि त्यानंतर या प्रकल्पामधील काही व्यवहार नियमबाह्यरीत्या मंजूर केले, असा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे.
 
 
Suspend Tukaram Mundhe
 
भाजपाच्या आरोपांनुसार, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची औपचारिक नेमणूक नसतानाही मुंढे यांनी प्रकल्पातील कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांचे पेमेंट केले होते. तसेच महिला अधिकाऱ्यांना धमकावल्याचेही आरोप त्यांच्यावर आहेत. या दोन्ही प्रकरणांचे एफआयआर त्या वेळी पोलिसांकडे दाखल झाले होते, परंतु तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमुळे पुढील कारवाई होऊ शकली नसल्याचा आरोपही भाजपाने अधोरेखित केला आहे. आता हे जुने विषय पुन्हा पुढे आणून मुंढे यांच्या निलंबनासाठी भाजप आमदार दबाव आणणार आहेत.
 
तुकाराम मुंढे हे राज्यातील सर्वात ठाम आणि नियमपालनावर ठाम राहणारे अधिकारी मानले जातात. त्यांची काटेकोर कार्यशैली अनेकदा राजकीय वर्तुळाला न पटल्याने, त्यांची बदली हा त्यांच्या करिअरचा नित्याचा भाग झाला आहे. गेल्या २० वर्षांत तब्बल २४ वेळा त्यांची बदली झाली असून, नुकतीच त्यांची नियुक्ती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. प्रशासनातील त्यांच्या या सातत्यानं होणाऱ्या बदल्या हा एक वेगळाच ‘रेकॉर्ड’ बनला आहे.