बँकॉक,
Thailand launches airstrikes on Cambodia अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर अनेक युद्धे रोखल्याचा दावा सातत्याने केला असतानाच, त्यांच्या पुढाकाराने झालेला थायलंड–कंबोडिया युद्धविराम करार अल्पकाळ टिकून पुन्हा दोन्ही देशांमधील तणाव वाढलेला दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये ट्रम्प यांच्या मध्यस्थीने युद्धबंदी करार झाला होता; मात्र त्यानंतर काही आठवड्यांतच सीमाभागात पुन्हा शस्त्रसत्र सुरू झाले असून परिस्थिती चिघळली आहे. थायलंडने कंबोडियाच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ले केल्यानंतर तणाव आणखी वाढला.
दोन्ही देशांनी एकमेकांवर प्रथम हल्ला केल्याचा आरोप करत आपापली भूमिका कडक केली आहे. थाई लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल विंथाई सुवारी यांनी सांगितले की कंबोडियन सैन्याने अनेक भागात गोळीबार केला, ज्यात एक थाई सैनिक ठार झाला आणि चार जखमी झाले. गोळीबार वाढत असल्याने प्रभावित भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे. थाई लष्कराने कंबोडियाच्या लष्करी स्थानांना लक्ष्य करत प्रत्युत्तरादाखल हवाई कारवाया केल्याचेही त्यांनी सांगितले.
दुसरीकडे, कंबोडियन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते माली सोचेता यांनी थायलंडवरच पहिला हल्ला केल्याचा आरोप केला. प्रारंभी कंबोडियाने प्रतिहल्ला टाळला असून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, पण थाई सैन्याच्या पुढील कारवायांमुळे संघर्ष वाढल्याचे त्यांनी सांगितले. कंबोडियाने थायलंडला त्वरित शत्रुत्वपूर्ण हालचाली थांबवण्याचे आवाहन करत या प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेला धोका निर्माण करू नये, अशी मागणी केली आहे. यापूर्वी जुलै महिन्यात सीमावादांमुळे दोन्ही देशांमध्ये पाच दिवसांची जोरदार लढाई झाली होती, ज्यात डझनभर सैनिक आणि नागरिकांनी जीव गमावला होता. आता पुन्हा संघर्ष उफाळल्याने दक्षिण–पूर्व आशियातील परिस्थिती गंभीर होत असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.