मुंबई,
When will I get 1500? ‘लाडकी बहिण’ योजनेचा नोव्हेंबर महिना संपला आणि डिसेंबरही सुरू झाला, तरीही महिलांना मिळणाऱ्या मासिक ₹1500 च्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये हप्ता नेमका कधी जमा होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. नोव्हेंबरचा हप्ता उशिरा झाला असल्याने डिसेंबरचा हप्ता मिळणार की नाही, याबाबतही शंका व्यक्त होत आहेत. काही सूत्रांनुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते महिलांना एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप शासनाकडून कोणतेही ठोस निवेदन जारी झालेले नाही.
डिसेंबरचा हप्ता महापालिका निवडणुकांनंतर जमा होऊ शकतो, अशीही चर्चा आहे. यासंदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे लवकरच अधिक माहिती देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, योजनेचा लाभ निरंतर मिळावा यासाठी KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. लाभार्थी महिलांसाठी KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. दिलेल्या वेळेत KYC न केल्यास पुढील हप्त्यांवर महिलांचा हक्क राहणार नाही. त्यामुळे महिलांनी तातडीने ऑनलाइन KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
योजनेबाबत निर्माण झालेल्या शंकांना उत्तर देताना वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘लाडकी बहिण’ योजना बंद करण्याचा कोणताही प्रश्नच नाही. त्यामुळे योजनेबाबत सुरू असलेल्या गैरसमजांना पूर्णविराम मिळाला आहे. लाभार्थी महिलांना सध्या हप्त्याच्या तारखेची प्रतीक्षा असली तरी, KYC पूर्ण करणे आणि खात्यातील व्यवहार नियमित ठेवणे हे महत्त्वाचे असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.