मुंबई,
Winter Session Nagpur News गेल्या दोन दिवसांपासून ‘इंडिगो’ एअरलाइन्सच्या उड्डाण गोंधळाचा परिणाम नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावरही झाला. राज्यातील अनेक मंत्री, आमदार आणि विधिमंडळासाठी येणाऱ्या अधिकारी प्रवासाचे नियोजन बदलण्यास भाग पाडले गेले. काहींना मुंबईहून नागपूर गाठण्यासाठी ‘समृद्धी’ महामार्ग आणि रेल्वेचा आधार घ्यावा लागला, तर काहींनी चार्टर विमानाचा उपयोग करून नागपूर पोहोचले. विधानसभा सभापती प्रा. राम शिंदे यांनी मुंबई आणि पुण्याहून येणाऱ्या अधिकारी व आमदारांसाठी विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करण्याचे आदेश दिले.
विमानसेवा रद्द झाल्यामुळे मंत्री संजय राठोड, हसन मुश्रीफ आणि आमदार बालाजी किणीकर, अनिल परब, भास्कर जाधव, सुलभा गायकवाड, मनीषा चौधरी यांच्यासह अनेक आमदारांनी रेल्वेचा वापर करून नागपूर गाठले. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि आमदार सुनील प्रभू यांनी महामार्गाचा उपयोग करत नागपूरला पोहोचणे पसंत केले. तसेच उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नीलेश राणे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांसह काही मंत्री चार्टर विमानांद्वारे नागपूर दाखल झाले. मुख्यमंत्र्यांच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईहून नागपूर येण्यासाठी आपला दौरा बदलण्यास भाग पाडले गेले. यामुळे फडणवीस आणि मंत्री नीलेश राणे यांना चार्टर विमानाद्वारे नागपूर पोहोचावे लागले.