नवी दिल्ली.
350 players for IPL auction आयपीएल २०२६ च्या लिलावासाठी ३५० खेळाडूंची अंतिम यादी जाहीर झाली असून या यादीत दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकची अचानक एन्ट्री झाल्याने खळबळ उडाली आहे. सुरुवातीच्या मोठ्या यादीनंतर सर्व फ्रँचायझींशी झालेल्या चर्चेनंतर BCCIने ही अंतिम निवड निश्चित केली. लिलाव १६ डिसेंबरला दुपारी २:३० वाजता अबू धाबीच्या एतिहाद अरेनामध्ये भारतीय वेळेनुसार सुरू होणार आहे.

बीसीसीआयने प्रथम १,३५५ खेळाडूंची यादी तयार करून फ्रँचायझींना त्यातील पसंतीची नावे पाठवण्यास सांगितले होते. त्यानंतर छाटणी करून ३५० खेळाडूंची अंतिम यादी तयार झाली. या यादीत ३५ नवीन नावे समाविष्ट करण्यात आली असून डी कॉक हे सर्वात महत्त्वाचे नाव मानले जात आहे. सुरुवातीच्या यादीत त्यांचे नाव नसतानाही एका फ्रँचायझीच्या विशेष शिफारसीवर त्यांना सामावून घेण्यात आले. नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्यांनी विशाखापट्टणममध्ये शतक झळकावत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि त्यानंतर आयपीएलमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांची मूळ किंमत १ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे, जी मागील मेगा लिलावातील किमतीच्या निम्मी आहे. गत हंगामात त्यांना घेतलेल्या Kolkata Knight Ridersने निराशाजनक कामगिरीनंतर त्यांची सुटका केली होती.
अंतिम यादीत श्रीलंकेच्या ट्रेविन मॅथ्यू, बिनुरा फर्नांडो, कुसल परेरा आणि डुनिथ वेल्लालागे यांसह अनेक परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. लिलावाची सुरुवात कॅप्ड खेळाडूंनी होणार असून प्रथम फलंदाज, मग अष्टपैलू, यष्टीरक्षक, वेगवान गोलंदाज आणि शेवटी फिरकीपटूंची बोली होईल. त्यानंतर अनकॅप्ड खेळाडूंसाठी लिलाव सुरू होईल. पहिल्या सेटमध्ये डेव्हॉन कॉनवे, जेक फ्रेझर-मॅकगर्क, सरफराज खान, पृथ्वी शॉ, डेव्हिड मिलर आणि कॅमेरॉन ग्रीन यांचा समावेश आहे, तर वेंकटेश अय्यरचा समावेश दुसऱ्या अष्टपैलूंच्या गटात असेल. यावेळी पुन्हा एकदा अॅक्सिलरेटेड राउंड ठेवण्यात येणार आहे. बोर्डाने पाठवलेल्या सूचनेनुसार, खेळाडू क्रमांक ७०—अफगाणिस्तानचा वहिदुल्लाह झद्रान—याच्या नंतर ही प्रक्रिया सुरू होईल. ७१ ते ३५० क्रमांकातील सर्व खेळाडू पहिल्या अॅक्सिलरेटेड राउंडमध्ये असतील आणि त्यानंतर फ्रँचायझींना पुन्हा विचारात घ्यायच्या खेळाडूंची नावे मागवली जातील.
अंतिम यादीत परदेशी खेळाडूंमध्ये अफगाणिस्तानचा अरब गुल, इंग्लंडचे माइल्स हॅमंड आणि डॅन लॅटिगन, दक्षिण आफ्रिकेचे कोनर अझथर्नसेन, जॉर्ज लिंडे आणि बायंडा माजोला, तसेच वेस्ट इंडिजचा अकीम ऑगस्टे यांचा समावेश आहे. भारतीय खेळाडूंमध्ये सादेक हुसेन, विष्णू सोलंकी, साबीर खान, ब्रिजेश शर्मा, कनिष्क चौहान, आरोन जॉर्ज, जिक्कू ब्राईट, श्रीहरी नायर, माधव बजाज, श्रीवत्स आचार्य, यशराज पुंजा, साहिल पारख, रोशन वाघसरे, यश डिचोलकर, अयाज खान, धुर्मिलशा वालकर, पुष्कळ वलकर, ना. अग्रवाल, ऋषभ चौहान, सागर सोलंकी, इजाज सावरिया आणि अमन शेखावत ही अनेक नवी व उदयोन्मुख नावे यामध्ये आहेत. या सर्व घडामोडींमुळे आयपीएल २०२६ चा लिलाव पूर्वीपेक्षा अधिक उत्सुकता वाढवणारा ठरत आहे.