इस्लामाबाद,
6 soldiers killed in Pakistan TTP attack तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेने पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यावर गंभीर हल्ले चढवले असून, खैबर पख्तूनख्वातील कुर्रम जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांत पाकिस्तानचे सहा जवान ठार झाले आहेत. माहितीनुसार, या घटनांमध्ये अनेक सैनिक जखमी असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मागील काही दिवसांपासून टीटीपीकडून पाकिस्तानी सैन्यावर वारंवार हल्ले होत असल्याने संपूर्ण प्रदेशात तणाव वाढला आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्रममधील मनाटो परिसरात टीटीपीने पाकिस्तानी जवानांवर एकापाठोपाठ दोन हल्ले केले. या भीषण कारवाईत सहा सैनिकांचा जागेवरच मृत्यू झाला, तर पाच ते सहा जवान गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे, पाकिस्तानचे पहिले संरक्षण दल प्रमुख (सीडीएफ) म्हणून असीम मुनीर यांनी पदभार स्वीकारल्याच्या काही दिवसांतच हा हल्ला घडल्याने त्यांच्या नेतृत्वाला थेट आव्हान दिल्याची चर्चा केपी प्रांतात जोर पकडत आहे. गेल्या काही आठवड्यांत टीटीपी आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यातील संघर्ष तीव्र झाला असून, अफगाणिस्तान सीमेलगतही परिस्थिती चिघळली आहे. पाकिस्तान एकीकडे टीटीपीच्या हिंसक हल्ल्यांना तोंड देत असताना, दुसरीकडे अफगाण सीमावर्ती भागातही तणाव वाढत असल्याने इस्लामाबाद दोन्ही बाजूंनी घेरल्याची भावना वाढीस लागली आहे.
खैबर पख्तूनख्वा हा आधीपासूनच अशांत प्रांत म्हणून ओळखला जातो. येथे पाकिस्तानी सैन्य आणि टीटीपीमध्ये वारंवार चकमकी होतात. सैन्य सतत दहशतवाद्यांविरोधात मोहीमा राबवत असते, तर टीटीपी त्याला जोरदार प्रत्युत्तर देत असते. त्यामुळे परिस्थिती कधीही अधिक उद्रेक करू शकते, असा इशाराही सुरक्षा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. दरम्यान, पाकिस्तानने अफगाणिस्तानवर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, टीटीपीचे अनेक सदस्य अफगाण सीमेपलीकडे आश्रय घेतात आणि तिथून पाकिस्तानी सैन्यावर हल्ल्यांची योजना आखतात. मात्र, काबूलमधील तालिबान सरकारने हा आरोप संपूर्णपणे फेटाळून लावला आहे. तरीही पाकिस्तान आपल्या भूमिकेवर ठाम असून, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. नुकतेच पाक-अफगाण सीमेजवळ अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्याचेही वृत्त आहे.