इस्लामाबाद,
Atrocities on Hindus in Pakistan : पाकिस्तानमध्ये अनेक दशकांपासून अल्पसंख्यकांवर, विशेषत: हिंदूंवर अत्याचार होत असून अशा घटना सतत समोर येत आहेत. आता सिंध प्रांतातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे अज्ञात बंदूकधाऱ्यांनी एका हिंदू महिलेचे आणि तिच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी सिंधमधील हिंदू विद्यार्थिनींवर शिक्षण सुरू ठेवण्यासाठी जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्याचा दबाव टाकल्याची घटना समोर आली होती.
घटना काय आहे?
ही भितीदायक घटना शनिवारी कराचीच्या शेरशाह येथील सिंधी मोहल्ल्यात घडली. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि तिच्या मुलीचे अज्ञात बंदूकधारकांनी अपहरण केले. प्राथमिक माहितीनुसार, महिला जशी घराबाहेर पडली, तशी तीन शस्त्रधारी व्यक्तींनी तिला जबरदस्ती पांढऱ्या कारमध्ये बसवून घेऊन गेले. या घटनेनंतर स्थानिक हिंदू समाजात तीव्र भीती आणि चिंता आहे.
‘जबरदस्ती इस्लाम स्वीकारण्याची शक्यता’
सिंधमधील नागरिक अधिकार कार्यकर्त्या शिवा काची यांनी सांगितले की रानी आणि तिची मुलगी अजूनही बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना भीती आहे की त्यांना जबरदस्ती इस्लाम स्वीकारायला लावला जाईल आणि अपहरणकर्त्यांपैकी कोणाशी तरी त्यांचे लग्न लावले जाईल. शिवा काची म्हणाल्या, "आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, पण ज्या पद्धतीने तीन शस्त्रधारी लोकांनी आई-मुलीला उचलून नेले, ते अतिशय चिंताजनक आहे."
त्यांनी पुढे सांगितले की सिंध प्रांतात अनेकदा हिंदू मुली आणि महिलांचे अपहरण केले जाते आणि त्यांना जबरदस्ती धर्मांतर करावे लागते. त्यानंतर त्यांचे लग्न त्यांच्या वयापेक्षा खूप मोठ्या मुस्लिम पुरुषांशी लावले जाते. सिंधमधील उमरकोट येथेही एका हिंदू मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. अलीकडेच तिचे लग्न झाले होते आणि ती पतीसोबत आई-वडिलांना भेटण्यासाठी जात होती. तेवढ्यात शस्त्रधारी व्यक्तींनी तिला पळवण्याचा प्रयत्न केला, पण ते यशस्वी झाले नाहीत.