पणजी,
Blue Corner Notice against Luthra brothers गोव्यातील नाईटक्लबमधील आगीच्या प्रकरणानंतर फरार झालेल्या लुथरा बंधूंचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा पावले उचलत असून त्यांच्या विरोधात इंटरपोलमार्फत ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्याची शक्यता आहे. सौरव आणि गौरव लुथरा हे दोन्ही भाऊ देशातून पळून गेले असून, आगीनंतरच्या दुसऱ्याच दिवशी रविवारी त्यांनी भारत सोडून थेट फुकेटला उड्डाण केले असल्याची माहिती समोर आली आहे.
गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगात सुरू केला असून, दिल्लीमध्येही सतत छापेमारी केली जात आहे. लुथरा बंधूंच्या तिसऱ्या भागीदाराचा शोध अधिक तीव्र केला असून, अजय गुप्ता याचे नाव या प्रकरणात पुढे आले आहे. त्याला शोधून चौकशी करण्याची तयारीही सुरू आहे. दरम्यान, अटक वॉरंटनंतर गोवा आणि दिल्ली पोलिसांचा पथक लुथरा बंधूंच्या दिल्लीतील घरी पोहोचले. घर जीटीबी नगर परिसरात असून तेथे कुलूप लावलेले आढळले, कोणतीही व्यक्ती उपस्थित नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, लुथरा बंधूंनी गेल्या महिन्याच्या ७ तारखेला पहाटे ५:३० च्या विमानाने भारत सोडला आणि त्यानंतर ते परतलेले नाहीत. तपासकेंद्री यंत्रणा आता आंतरराष्ट्रीय मदतीचा आधार घेत त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न वाढवत आहेत.