दिग्रसच्या ‘निधी’ प्रकरणाला उद्या वर्ष

हस्तगत केलेल्या रकमेचे काय ?

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
अभय इंगळे
दिग्रस, 
Jansangharsh Urban Fund case : जनसंघर्ष अर्बन निधी प्रकरणाला 9 डिसेंबरला पूर्ण बारा महिने उलटले. लोकांच्या कष्टाचे पैसे अडकून पडले आहेत. दरम्यान कारवाई झाली, सर्व आरोपींना अटकही झाली. मग परताव्याला इतका विलंब का, असा प्रश्न खातेदार विचारत आहेत.
 
 

y9Dec-Jan-Sangharsha-Logo 
 
 
आतापर्यत 2 कोटी 98 लाख 88 हजार 170 रुपये रोख, शिवाय सहा दुचाकी आणि 4 चारचाकी वाहने असून एकूण 18 स्थावर मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केल्या. पोलिस ठाण्यात सर्व वाहने धूळ खात आहेत, याचा लिलाव करून आम्हास परतावा द्या, अशी आर्त हाक ठेवीदारांची आहे.
 
 
6 हजार 200 खातेदारांचे 44 कोटी रुपये जनसंघर्ष अर्बन निधीत अडकून पडले आहेत. अगदी भरदिवसा लोकांच्या कष्टाचे पैसे आरोपींनी लुटले. या लुटारूंकडून पैसे वसूल करण्यात विलंब का, आज बँकेच्या नियमाने 1 लाखावर 12 हजार रुपये व्याज मिळाले असते किमान आमची मुद्दल रक्कम तरी द्या, असे खातेदार बोलत आहेत.
 
 
प्रशासनाकडून एसआयटी स्थापन करण्यात आली. एमपीआयडी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडूनही तपास करण्यात आला. मास्टरमाईंड प्रणित मोरे असल्याचे समोर आले. आरोपींच्या घर झडतीत काही दस्तावेज पोलिसांच्या हाती लागले. अपहार रकमेतून मालमत्ता, वाहने खरेदी, आर्थिक व्यवहार झाल्याचे चौकशीत उघड झाले होते.
 
 
संचालकांसोबतच इतर दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले, शिवाय फॉरेन्सिक ऑडिटर, सक्षम प्राधिकारी नियुक्तीची कार्यवाही पूर्ण झाली, चौकशीअंती अपहार 49 कोटींचा असल्याचे शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर सर्व आरोपींविरुद्ध दारव्हा न्यायालयात प्राथमिक दोषारोपपत्र दाखल झाले. मग आमचे पैसे परत का दिले जात नाहीत, असा प्रश्न गुंतवणूकदार विचारत आहे.
 
 
आरोपी प्रणित देवानंद मोरे, देवानंद लक्ष्मण मोरे, जयश्री देवानंद मोरे, प्रीतम देवानंद मोरे, साहिल अनिल जयस्वाल, अनिल रामनारायण जयस्वाल, पुष्पा अनिल जयस्वाल, आलमगीर खान जहागीर खान, नूर मोहंमदखान गुलाबखान या आरोपींविरुद्ध दारव्हा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
 
 
मात्र हस्तगत केलेल्या रकमेचे काय असा प्रश्न कायम आहे. दिग्रसच्या ‘निधी’ प्रकरणाची तीव्रता ओसरली असली तरी आज एक वर्षांनी पुन्हा आपल्या जमा रकमेची चिंता व त्यावर संताप व्यक्त होत आहे.