टोकियो,
Earthquake in Japan जपानच्या उत्तर किनाऱ्यावर सोमवारी रात्री शक्तिशाली भूकंप जाणवल्याने त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. रात्री ११:१५ च्या सुमारास आलेल्या या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.६ नोंदली गेली. सुरक्षेच्या दृष्टीने किनारपट्टीवरील लोकांना तात्काळ उंच स्थळी हलवण्याचे आवाहन करण्यात आले. जपानच्या हवामानशास्त्र संस्थेनुसार, भूकंपाचे केंद्रबिंदू आओमोरी आणि होक्काइडो या उत्तर भागांच्या किनाऱ्यावर सुमारे ५० किलोमीटर खोलीवर होते.

या भागासाठी तीन मीटरपर्यंतच्या त्सुनामीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे परिसरात सावधगिरी वाढवण्यात आली आहे. टोकियोसह अनेक शहरांमध्ये धक्क्यांची तीव्रता जाणवली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याआधीही नोव्हेंबर महिन्यात उत्तर भागात ६.९ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्या वेळी संध्याकाळी ५:०३ वाजता इवाते किनारी भागात केंद्रबिंदू असलेला भूकंप जाणवला होता. त्यावेळी एक मीटरपर्यंतच्या त्सुनामीचा अंदाज व्यक्त झाला होता, तर काही अंदाजांनुसार लाटांची उंची तीन मीटरपर्यंत जाऊ शकते असे मानले जात होते. मात्र प्रत्यक्षात ओफुनारो, मियाको आणि कामाइशी परिसरात केवळ १० ते २० सेंटीमीटरच्या लाटा नोंदवून परिस्थिती स्थिर झाल्यावर चेतावणी मागे घेण्यात आली होती. त्या घटनेनंतर अनेक दिवस आफ्टरशॉक्स सुरूच राहिले. ताज्या भूकंपानंतरही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून सतत अद्ययावत इशारे देण्याचे काम सुरू आहे.