जकार्तात अग्नितांडव; २० पेक्षा अधिक मृत्यू

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
जकार्ता,
Firestorm in Jakarta इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे शुक्रवारी दुपारी भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. सात मजली कार्यालयीन इमारतीला अचानक पेटलेल्या आगीने क्षणार्धात वेढा घातला आणि काही वेळातच इमारतीत दाट काळा धूर पसरला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत २० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये पाच पुरुष, १५ महिला आणि एका गर्भवती महिलेचा समावेश आहे.
 
jakarta fire
 
ही इमारत टेरा ड्रोन इंडोनेशिया या ड्रोन सेवा पुरवणाऱ्या कंपनीची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कंपनी विविध औद्योगिक क्षेत्रांसाठी—खाणकाम, शेती इत्यादींसाठी ड्रोन तंत्रज्ञान उपलब्ध करून देते. आग लागली तेव्हा काही कर्मचारी जेवणाच्या सुट्टीत इमारतीबाहेर होते, तर काही जण आत कामावर होते. पहिल्या मजल्यावर लागलेली आग काही क्षणांत वरच्या मजल्यांवर पसरली आणि परिस्थिती गंभीर बनली.
 
अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. बचावकार्याला प्राधान्य देत जवानांनी इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. कॉम्पास टीव्हीने दाखवलेल्या दृश्यांमध्ये काही लोक वरच्या मजल्यांवरून पोर्टेबल शिड्यांच्या साहाय्याने खाली उतरवले जात असल्याचे दिसते. आग कशामुळे भडकली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तपास सुरू आहे. भीषण आगीमुळे मध्य जकार्ता आणि आसपासच्या परिसरातही मोठी घबराट निर्माण झाली होती. अधिकाऱ्यांनी आता आग पूर्णपणे आटोक्यात आल्याचे सांगितले असून बचावकार्य आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.