छतरपूर,
food poisoning in Khajuraho मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील खजुराहो येथे अन्न विषबाधेमुळे घडलेली गंभीर घटना समोर आली असून खजुराहो येथील गौतम रिसॉर्टमधील जेवणामुळे तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जणांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. रिसॉर्टमधील काही कर्मचाऱ्यांनी जेवण केल्यानंतर अचानक उलट्या, अस्वस्थता आणि तीव्र डोकेदुखीची तक्रार केली. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने खजुराहो प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; परंतु प्रकृती सतत बिघडत गेल्याने सर्वांना छतरपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान प्रगीलाल कुशवाह, गिरजा रजक आणि रामस्वरूप कुशवाह या तिघांचा मृत्यू झाला.

मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. आर.पी. गुप्ता यांनी सांगितले की, अन्न विषबाधेची लक्षणे दिसल्यानंतर एकूण नऊ जणांना दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने काहींना पुढील उपचारांसाठी ग्वाल्हेर मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आले. आरोग्य विभाग आणि अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने तात्काळ रिसॉर्टमध्ये जाऊन तपास सुरू केला. तयार केलेल्या अन्नाचे नमुने जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले गेले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानील जागा पोलिसांनी सील केली आहे. अन्नात नेमकी कोणती दूषितता किंवा निष्काळजीपणा झाला, हे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
जिल्हाधिकारी पार्थ जयस्वाल यांनी ही घटना अत्यंत गांभीर्याने घेतली असून मृतांच्या कुटुंबीयांसाठी तातडीची मदत म्हणून रेड क्रॉस सोसायटीमार्फत प्रत्येकी २०,००० रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. भविष्यात आणखी मदतीचा विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील सर्व प्रमुख हॉटेल्स व रिसॉर्टमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. खजुराहोमधील अनेक ठिकाणांहून अन्नाचे नमुने घेतले गेले असून ते तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.