नवी दिल्ली,
H3N2 influenza virus हिवाळ्याच्या सुरुवातीसोबतच एक नवा आरोग्यधोका समोर आला आहे. H3N2 इन्फ्लूएंझा विषाणू पुन्हा सक्रिय झाला असून त्याचा संसर्ग वेगाने वाढत आहे. इन्फ्लूएंझा-A परिवारातील हा प्रकार दरवर्षी जगभरातील मोठ्या लोकसंख्येला फ्लूची लागण करतो. CDC च्या माहितीनुसार, हा विषाणू प्रथम 1968 मध्ये पक्ष्यांमधून मानवांमध्ये आला आणि तेव्हापासून त्यात सतत बदल होत आहेत. याच कारणामुळे लसींचा परिणाम त्याच्यावर मर्यादित प्रमाणात दिसून येतो.
H3N2 च्या पृष्ठभागावर असलेली स्पाइक प्रथिने नाक-घशातील पेशींना चिकटतात आणि त्यात प्रवेश करून पेशींना हजारो नवीन विषाणू तयार करण्यास भाग पाडतात. एका संक्रमित पेशीतून काही तासांत जवळपास दहा हजार नवीन विषाणू तयार होऊ शकतात, त्यामुळे संसर्गाचा वेग अत्यंत जलद असतो. अलीकडील संशोधनात असेही आढळले आहे की या विषाणूने स्वतःभोवती साखरेचे आवरण तयार केले असून त्यामुळे रोगप्रतिकारक यंत्रणा त्याला ओळखण्यात अपयशी ठरते. त्यामुळे त्याची ताकद आणखी वाढली आहे.
थंड आणि कोरडे वातावरण या विषाणूस अधिक पोषक ठरते. लोक घरात जास्त वेळ राहिल्याने संसर्गाचा प्रसार वेगाने होतो. मुले आणि वृद्ध यांच्यात धोका सर्वाधिक असून संक्रमणाची शक्यता इतरांपेक्षा चार पट जास्त आहे. भारतात ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी सुमारे 20 टक्के नमुने H3N2 साठी पॉझिटिव्ह आढळले. दरम्यान, युनायटेड किंगडममध्येही परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या हंगामात फ्लू पॉझिटिव्हिटी दर 11.6 टक्क्यांवरून 17.1 टक्क्यांपर्यंत झपाट्याने वाढला आहे. पाच ते चौदा वयोगटातील मुलांमध्ये हा दर तब्बल 43.6 टक्के आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही 56 टक्क्यांनी वाढली आहे. यामागे पसरत असलेला नवीन सबक्लेड J.2.4.1 अधिक आक्रमक असल्याचा संशय आहे.
उच्च ताप, कोरडा खोकला, घसादुखी, अंगदुखी, तीव्र थकवा अशी याची मुख्य लक्षणे आहेत. तर वृद्धांमध्ये न्यूमोनियाची शक्यता 5 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढते. WHO च्या माहितीनुसार, H3N2 हा H1N1 पेक्षा साधारण दीडपट अधिक गंभीर स्वरूपाचा आहे. शिंक-खोकल्यातून पसरणारे थेंब जवळपास एक मीटरपर्यंत संसर्ग पोहोचवू शकतात. तसेच विषाणू पृष्ठभागांवर 48 तास टिकून राहू शकतो. संसर्गाच्या तिसऱ्या-चौथ्या दिवशी तो सर्वाधिक पसरतो.
तज्ञांच्या मते, दरवर्षी फ्लू लस घेणे हा सर्वात प्रभावी प्रतिबंधक उपाय आहे, ज्यामुळे सुमारे 40 ते 60 टक्के संरक्षण मिळते. फ्लूची लक्षणे दिसू लागताच काही दिवस घरात राहणे, भरपूर पाणी पिणे आणि विश्रांती आवश्यक आहे. लक्षणे सुरुवातीच्या 48 तासांत अँटीव्हायरल उपचार सुरू केल्यास आजाराची तीव्रता साधारण 30 टक्क्यांनी कमी होते. हात धुणे, मास्कचा वापर आणि स्वच्छता या सर्व गोष्टी संसर्ग रोखण्यात महत्त्वाच्या ठरतात. तज्ञांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन डीचे सेवन करण्याचाही सल्ला दिला आहे.