६ वर्षीय चिमुकलीचा अपहरणकर्ता ताब्यात

वरूड पोलिसांची कारवाई

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
वरूड, 
kidnapper-in-custody : बैतुल जिल्ह्यातील मुलताई पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम दाबका येथील ६ वर्षीय चिमुकलीला ७ डिसेंबर रोजी अज्ञात इसमाने पळवून नेले होते. याप्रकरणी मुलताई पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली होती. त्या अपहरणकर्त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
 
 
NJK
 
या प्रकरणी तक्रारदाराने अनिल कुसराम (२८, रा.खडका, ता. वरुड) याच्यावर संशय व्यक्त केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बैतुल पोलिसांचे व बेनोडा ठाण्याचे ठाणेदार विवेक देशमुख यांचे पथक रात्री दरम्यान संशयित आरोपीच्या शोधात खडका येथे आले. आरोपीचा शोध घेतला तेव्हा तो घरी मिळून आला नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांनी उपरोक्त दोन्ही पथक व जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन ठाणेदार यांना घटनेची सविस्तर माहिती देऊन चिमुकलीचा व आरोपीचा शोध घेण्यासाठी आदेश निर्गमित केले. तिवसा ठाण्याचे ठाणेदार गोपाल उपाध्याय हे त्यांच्या पथकासह चिमुकलीचा व संशयित आरोपीचा शोध घेत असताना ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नंदलाल गंधे रा. तिवसा, होळकर चौक यांच्याकडून त्यांना माहिती मिळाली की , एक अंदाजे २५-३० वर्षाचा युवक एका लहान मुलीला घेऊन मारोती पुनसे रा. निंभोरा देलवाडी यांच्या शेतात काम मागण्यासाठी आला आहे.
 
 
त्यावरून संशय बळावल्याने ठाणेदार उपाध्याय ताफ्यासह तत्काळ दाखल झाले. तेव्हा तिथे अपहरण झालेली चिमुकली सुरक्षित मिळून आली. परंतु त्यापूर्वीच आरोपीला शंका आल्याने आरोपी अनिल कुसराम हा तेथुन पसार झाला. परंतु, ९ डिसेंबर रोजी वरूडचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिस उपनिरिक्षक राजू मडावी, जमादार मनोज टप्पे, सचिन भगत यांच्या पथकाने संत्रा मंडीमध्ये जाऊन शोध घेतला असता सदर गुन्ह्यातील फरार आरोपी अनिल याने पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला. संत्रा मंडी येथून शासकीय विश्रामगृहपर्यंत पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाई सुरू आहे. आरोपीला मुलताई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.