सुलतानपूर,
Kiss video of a newlywed couple उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे पूर्वांचल एक्सप्रेसवेवरील टोल प्लाझा व्यवस्थापनातील एक गंभीर गैरप्रकार उघड झाला आहे. एक्सप्रेसवेवरील वाहतूक विरोधी व्यवस्थापन यंत्रणेचे सहाय्यक व्यवस्थापक आशुतोष विश्वास यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा गैरवापर करून प्रवाशांच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, आशुतोष विश्वास हे सीसीटीव्ही फूटेजचा वापर करून वाहनांमध्ये खाजगी क्षणात असलेल्या जोडप्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होते आणि त्यांना ब्लॅकमेल करून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळत होते.
ही घटनाचक्र हल्यापूर पोलिस स्टेशन हद्दीत घडली असून, एक्सप्रेसवेवर नजर ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तीन कर्मचाऱ्यांपैकी आशुतोष विश्वास यांनी आपली जबाबदारीच दुरुपयोगासाठी वापरल्याचे कळते. तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की ते परिसरातील काही महिलांचे आणि मुलींचे शौचास बसताना काढलेले व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर प्रसारित करत होते. ब्लॅकमेल करून पैसे मिळाल्यानंतरही हे व्हिडिओ व्हायरल केले जात होते.
अत्यंत धक्कादायक म्हणजे, एका नवविवाहित जोडप्याचा कारमध्ये घेतलेला खाजगी क्षण त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे झूम करून रेकॉर्ड केला आणि तो व्हिडिओही सोशल मीडियावर पसरण्याचे काम केले. या प्रकरणामुळे एक्सप्रेसवेवरील सुरक्षा व गोपनीयता व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.२ डिसेंबर रोजी काही नागरिकांनी या संदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल केली, जी सोशल मीडियावरही व्हायरल झाली. तक्रार समोर आल्यानंतर कारवाई करत आशुतोष विश्वास यांना मागील तारखेपासून सेवेतून बडतर्फ केले आहे. त्यांच्या बडतर्फीचे पत्र ३० नोव्हेंबर रोजीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घोटाळ्यानंतर एक्सप्रेसवेवरील निगराणी प्रणालीची विश्वसनीयता व नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे.