सेलू,
leopard-skin-smuggling-case : तालुक्यातील सुकळी मार्गावर वन विभागाने सोमवार ८ रोजी सायंकाळी केलेल्या कारवाईत बिबट्याच्या कातडीची तस्करी करणार्या तिघांना अटक केली. कारवाईदरम्यान बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना मंगळवार ९ रोजी सेलू येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना एक दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
शालिनी हरिदास पावर (४३) रा. खरांगणा मोरांगणा, सौरभ रुंदई (४५) रा. मोहगाव झिल्पी, ता. हिंगणा, जि. नागपूर व अनिस तुमडाम (१९) रा. बोरगाव नांदुरा अशी आरोपींची नावे आहेत. वनविभागाने आरोपींकडून बिबट्याची कातडी जप्त केली असून, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. तसेच, गुन्ह्यात वापरलेले हत्यार, बिबट्याची शिकार कुठे करण्यात आली, त्या ठिकाणाची पाहणी, तसेच पंजे व नखे यांसह इतर पुरावे मिळविण्यासाठी सखोल तपास आवश्यक असल्याचे वन विभागाने न्यायालयासमोर मांडले.
शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील विशाखा गजभिये यांनी युतिवाद करत आरोपींना वन कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ती मान्य करत तिन्ही आरोपींना एक दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. वनविभाग या प्रकरणातील इतर संभाव्य आरोपींचा शोध घेत आहे.