घर मालकाने तालुका कृषी कार्यालयाला दुसर्‍यांदा ठोकले कुलूप

*थकीत भाडे न मिळाल्याने व्यत केला संताप

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
समुद्रपूर, 
locks Taluka Agriculture Office : शहरातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून सुधीर खडसे यांच्या घरी भाड्याने आहे. मात्र, ७ महिन्यांपासून भाडे मिळाले नसल्याने घरमालक खडसे यांनी थकित १ लाख २० हजार रुपये भाडे द्या, अन्यथा ९ रोजी कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा दिला होता. यावर कोणताही तोडगा न निघाल्याने खडसे यांनी आज मंगळवार ९ रोजी सकाळी ८ वाजता कृषी कार्यालयाला कुलूप ठोकून संताप व्यत केला. यापूर्वीही भाडे न मिळाल्याने याचघर मालकाने कार्यालयाला कुलूप ठोकले होते, हे उल्लेखनिय!
 
 

asD  
 
 
 
सुधीर खडसे यांच्या घरी जवळपास १५ वर्षांपासून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा कारभार चालविला जात आहे. मात्र, त्यांना नियमित भाडे मिळत नसल्याची तक्रार वेळोवेळी करण्यात येते. याआधी सुद्धा अनेकवेळा भाडे मिळत नसल्याचे पत्र देऊन कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन त्यांना भाड्याचे पैसे देण्यात आले. मात्र, २०२५ मध्ये ७ महिण्याचे भाडे १ लाख २० हजार रुपये मिळाले नाही. त्यामुळे थकित भाडे मिळावे यासाठी त्यांनी अनेकवेळा कार्यालयात चकरा मारल्या. मात्र, उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याने त्यांनी ८ डिसेंबरपर्यंत भाडे देण्यात यावे, अन्यथा ९ रोजी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा निवेदनातून दिला होता. कायदा हातात घेण्यास बाध्य करू नका, असा इशारा घर मालक सुधीर खडसे यांनी जिल्हाधिकारी, खा. अमर काळे, आ. समीर कुणावार, तहसीलदार, ठाणेदार यांना दिला होता. मात्र, यावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने खडसे आज सकाळी ८ वाजताच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकले. जोपर्यंत भाड्याचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, असा इशारा दिला आहे.
 
 
सोमवारपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अशातच कृषी कार्यालयाला कुलूप लावल्याने प्रशासनाकडून कोणता तोडगा काढल्या जातो, याकडे लक्ष लागले आहे.