नागपूर,
Nagpuri Kharya नागपुरी खर्रा हा विदर्भातच नाही तर आता महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यातही कुप्रसिद्ध झाला आहे. हा खर्रा थुंकल्यावर दिसणाऱ्या खाणाखुणा नागपूरची ओळख सिद्ध करतात. हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवसही याला अपवाद नव्हता. पहिल्याच दिवशी विधिमंडळ परिसरात खर्रा थुंकल्याच्या नागपुरी खाणाखुणा नजरेस पडल्या. हिवाळी अधिवेशनाला साेमवार 8 डिसेंबरपासून सुरुवात झाली. विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी 28 सप्टेंबर 1953 राेजी संमत झालेल्या करारानुसार उपराजधानीत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली.

सुरुवातीला महिनाभर चालणारे हे अधिवेशन आक्रसून आता जेमतेम आठवडाभरावर आले आहे. यंदाचे अधिवेशनही केवळ आठ दिवसांचे हाेत आहे. परंतु त्यासाठीची तयारी मात्र महिनाभरापासून सुरू हाेती. विधानभवनाचे नूतनीकरण परिसर सजावट, मंत्र्यांचे बंगले, आमदारांची निवासस्थाने यासह इतरही बाबींवर जवळपास 90 काेटीं खर्च झाल्याची माहिती आहे. या सगळ्यातून आजपासून अधिवेशनाला सुरुवात झाली. कडेकाेट पाेलिस बंदाेबस्त आणि तपासणीनंतर प्रवेश दिला जात असतानाही पहिल्याच दिवशी विधानभवनामाेेरील डांबरी रस्त्यावर तसेच इतरही ठिकाणी खर्चा खाऊन थुंकल्याच्या खाणाखुणा दिसून आल्या. त्यामुळे मादक पदार्थ कुणाच्या जवळ आहे का या तपासणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून आले. नागपूर आणि खर्रा असे समिकरण पिचकारी रुपाने विधिमंडळातही पहिल्याच दिवशी दिसल्याने चर्चेचा विषय ठरला.