चंदिगढ,
Navjot Kaur Sidhu suspension पंजाब काँग्रेसमध्ये मोठा खळबळ निर्माण करणाऱ्या नवज्योत कौर सिद्धू यांच्या विधानांनंतर अखेर काँग्रेसने त्यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांना पक्षातून तात्काळ निलंबित केले आहे. माजी आमदार आणि काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी असलेल्या नवज्योत कौर यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या दाव्यांमुळे पक्षात मोठी खळबळ उडाली होती. गेल्या काही महिन्यांपासून त्या पक्षाच्या कोणत्याही उपक्रमात सहभागी नव्हत्या, त्यातच पक्षाच्या भूमिकेविरुद्ध सार्वजनिक वक्तव्य केल्याने त्यांच्यावर कारवाई अनिवार्य झाल्याचे काँग्रेसने जाहीर केले.
नवज्योत कौर यांनी ६ डिसेंबर रोजी आरोप केला होता की पंजाब काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी आणि तिकीट वाटपासाठी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले जातात. त्यांनी तरनतारण पोटनिवडणुकीचा संदर्भ देत काँग्रेस उमेदवार करणबीर सिंह बुर्ज यांना देण्यात आलेल्या तिकिटासाठी ५ कोटी रुपये घेतल्याचा आणि संपूर्ण व्यवहार ११ कोटींपर्यंत गेल्याचा दावा केला होता. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून हे झाले असल्याचेही त्यांनी सांगितले होते. काही नगरसेवक याबाबत बोलायला तयार असल्याचा आणि स्वतःकडे कॉल रेकॉर्डिंग असल्याचाही त्यांनी उल्लेख केला होता. त्यांच्या या विधानांचे पडसाद राजकीय वर्तुळात लगेच उमटले आणि विरोधकांनीही या प्रकरणावर निशाणा साधला. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दोन दिवसांत निर्णय घेत तात्काळ निलंबनाची कारवाई केली. नवज्योत कौर यांच्या विधानांचे राजकीय परिणाम पाहता, पक्षाने शिस्त मोडल्याचा ठपका ठेवत ही कठोर पावले उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.