कराची,
Pakistan Sindhudesh Demand : पाकिस्तानातील कराची शहरात स्वतंत्र सिंधुदेशच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन पेटले आहे. हे आंदोलन हिंसक झाल्याने परिसरात तणाव वाढला आहे. आंदोलकांनी रस्त्यावर उतरून जोरदार नारेबाजी केली, तर अनेक ठिकाणी दगडफेक, तोडफोड आणि पोलिसांसोबत संघर्षही झाला. सिंधी संस्कृती दिनानिमित्त जमलेल्या लोकांनी अचानक स्वतंत्र सिंधुदेशची मागणी सुरू केली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली.
'पाकिस्तान मुर्दाबाद'चे नारे
जिये सिंध मुत्तहिदा महाज (JSSM) या संघटनेच्या नेतृत्त्वाखाली मोठ्या संख्येने जमलेल्या सिंधी नागरिकांनी ‘आजादी’ आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे दिले. या आंदोलनामुळे सिंधी राष्ट्रवादी गटांच्या दशकांपासूनच्या स्वतंत्रतेच्या मागणीला आणखी जोर मिळाला आहे.
तणाव का वाढला?
प्रशासनाने रॅलीचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला तेव्हा आंदोलक भडकले. काही जणांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली आणि सरकारी मालमत्तेची तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंसूगॅसचे गोळे सोडले.
45 आंदोलक अटकेत
स्थानिक अहवालांनुसार, हिंसेदरम्यान 45 जणांना अटक करण्यात आली आहे. यात पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. सरकारने तोडफोड करणाऱ्यांची ओळख पटवून कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
सिंध प्रदेशाचा ऐतिहासिक संदर्भ
सिंध प्रदेश, जो सिंधू नदीलगतचा भाग आहे, भारत-पाकिस्तान फाळणीनंतर 1947 मध्ये पाकिस्तानात गेला. महाभारतात उल्लेखलेले ‘सिंध देश’ हेच आधुनिक सिंध मानले जाते. भारताचा तिसरा सर्वात मोठा प्रांत असलेला हा भाग आज पाकिस्तानात आहे.
भारताच्या संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य
अलीकडे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सिंध प्रदेश एक दिवस भारतात परत येऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यांनी सांगितले होते की अनेक सिंधी हिंदूंनी 1947 मध्ये सिंध पाकिस्तानात गेल्याचा निर्णय मनातून कधीच स्वीकारला नाही. त्यांच्या मते, सभ्यता आणि संस्कृतीच्या दृष्टीने सिंध नेहमीच भारताचा भाग राहिला आहे, आणि सीमा कधीही बदलू शकतात. ही संपूर्ण घटना सध्या पाकिस्तानात मोठ्या चर्चेचा विषय ठरली असून कराचीमध्ये परिस्थिती तणावपूर्णच आहे.

सौजन्य: सोशल मीडिया