अनिल कांबळे
नागपूर,
pistol-fired-in-bar : अधिवेशनामुळे शहरात पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त असला तरीही गुन्हेगारांनी डाेके वर काढले आहे. बाेमा नावाच्या एका क्रिकेट बुकीने एमआयडीसीतील बारमध्ये एका गायिका तरुणीला पिस्तुल दाखवून अश्लील चाळे केले. पिस्तुल बघताच बारमध्ये एकच खळबळ उडाली, ही घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे एमआयडीसी पाेलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला असून गुन्हेगारांशी पाेलिस कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध आहेत का, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाेमा हा क्रिकेट सट्टेबाजी व जुगारासाठी चर्चेत असताे. रविवारी त्याच्या मित्रांसह ताे एमआयडीसी हद्दीतील एका नामांकित बारमध्ये गेला हाेता. गायिका तरुणीला गाणे गाताना पाहून बाेमा तिच्यावर नाेटा उडवायला लागला. काही वेळाने त्या तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करायला लागला. त्याने तरुणीला स्वतःकडे ओढले. त्याने तिचा विनयभंग केला. या प्रकारामुळे गायिका घाबरली. ती तिच्या साथीदारांसह पळून गेली. बाेमा आणि त्याचे साथीदारही त्या गायिकेला पकडण्यासाठी धावले. पिस्तूल पाहून बारचे बाउन्सर मागे हटले. त्यानंतर उपस्थितांना पिस्तूल दाखवत आणि जिवे मारण्याची धमकी देत बाेमा आणि त्याचे साथीदार पळून गेले. या घटनेमुळे शहर पाेलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत विचारणा करण्यासाठी एमआयडीसीचे ठाणेदार गाेकुळ महाजन यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.