धामणगाव रेल्वे,
cattle-transport : नागपूरहून औरंगाबादकडे कत्तलीसाठी अवैधरीत्या नेले जात असलेल्या ३३ गोवंशांची सुटका मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी केली. समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ८९ येथे सोमवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे २० लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रक चालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे.
माहितीनुसार, नागपूरवरून औरंगाबाद येथे आयशर ट्रकद्वारे (क्र. एमएच ३० बीडी -६१७६) बेकायदा गोवंशाची वाहतूक होत असल्याची खात्रीलायक माहिती मंगरुळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार चॅनल नंबर ८९ परिसरात पोलिसांनी सापळा रचला. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये ३३ गोवंश आढळून आले. त्यानंतर गोवंशांची सुटका करून ट्रकसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधितांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून ट्रक चालक फरार झाला आहे. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक गौतम इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगरुल पोलिस ठाण्याचे शिंदे पाटील, अरुण पवार व सहदेव राठोड यांनी संयुक्तपणे केली.