चंद्रपूर,
sudhir-mungantiwar : मूल तालुक्यातील ऐतिहासिक श्रद्धास्थान असलेल्या सोमनाथ मंदिराला अखेर ‘तीर्थक्षेत्र ब दर्जा’ मिळाला असून, हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा ठोस पाठपुरावा आणि त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे.
मंदिर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास व्हावा, स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि परिसराची ओळख राज्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक नकाशावर अधिक भक्कम व्हावी, या दृष्टीने त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या मंजुरीमुळे सोमनाथ मंदिर परिसराच्या विकासाला आता नवी दिशा आणि गती मिळणार आहे.
तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा मिळाल्यानंतर सोमनाथ मंदिर परिसरात मूलभूत सुविधा उभारणी, परिसराचे नियोजित सौंदर्यीकरण, आधुनिक सुविधा विकास, पर्यटक केंद्र उभारणी तसेच स्थानिकांसाठी रोजगारनिर्मितीच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. सोमनाथ मंदिराला मिळालेल्या ‘तीर्थक्षेत्र-ब’ दर्जामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्था अधिक सुदृढ होईल. ‘ब’ दर्जानंतर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनस्तरावर विशेष निधी मंजुरी, नवीन सुविधा उभारणी आणि मोठ्या विकास आराखड्याची अंमलबजावणी वेगाने होणार आहे. त्यामुळे मूल तालुक्याचा एकूण विकास प्रवास आणखी गतिमान होणार असल्याने तालुक्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
मूल तालुक्याचा सर्वसमावेशक विकास
मूलच्या तालुक्यातील मुख्य रस्त्यांचे उन्नतीकरण, आकर्षक इको पार्क, अत्याधुनिक स्टेडियम, जलतरण तलाव, आदिवासी वसतिगृह, व्यायाम शाळा, पत्रकार भवन, कर्मवीर मा. सा. कन्नमवार सभागृह, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, तहसील कार्यालय इमारत, पंचायत समिती इमारत, कृषी महाविद्यालय, बसस्टँड, आठवडी बाजार, सुसज्ज सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज संकुल, 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी, मुल पॉलिटेक्निक कॉलेजला नुकतीच मंजुरी, नवीन पोलिस स्टेशन, ओव्हरब्रिज, पट्टे वितरण उपक्रम, रेस्ट हाऊस आणि योगाभवन या सर्व प्रकल्पांमुळे मुल तालुक्यातील प्रगतीचा पाया आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे अधिक भक्कम झाला आहे.