तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
jagannath-maharaj : असं म्हणतात की, अंत:करणात भगवंत प्रकट झाला की समस्त दुष्प्रवृत्ती नष्ट होतात. पण प्रश्न निर्माण होतो. भगवंत हृदयात, अंत:करणात कधी.. कसा.. प्रकट होणार? उत्तर आमच्या संतांनी दिलं. संत श्रेष्ठ तुकोबाराया म्हणतात, ‘कीर्तन चांग चांग होय अंग हरी रूप’ फक्त अंत:करणातच हरी येत नाही तर अंगअंग हरी रूप होतं. आणि जिथे हरी तिथे दृष्प्रवृत्ती, अनिष्ट, षड्विकार कसे असणार, अनिष्ट निवृत्ती आणि इष्टष्ट प्राप्ती करण्याचं साधन म्हणजे कीर्तन, असे प्रतिपादन जगन्नाथ महाराज (ठाणे) यांनी केले. कीर्तन महोत्सव समितीद्वारा आयोजित 18 व्या कीर्तन महोत्सवात द्वितीय कीर्तन पुष्प गुंफताना ते बोलत होते.
‘घालीन लोटांगण वंदिन चरण । डोळ्यांनी पाहीन रूप तुझे’ हा दोन चरणाचा अभंग निरूपणासाठी त्यांनी सादर केला. त्यांचे स्वागत डॉ. सुशील बत्तलवार यांनी केले. मृदंगाचार्य सुरेश महाराज लाखेकर, गायनाचार्य संतोष राऊत, पवन लाखेकर, संतोष शेंदुरकर, लंकेश जांभारे, सुरेंद्र बेणकर, मुरली बांदरे, मनीष इसाळकर, सूर्यभान बावणे, रत्नाकर कुळकर्णी, रामाजी चौधरी, खनगई, ढोबळे, संवादिनीवादक चंद्रकांत राठोड यांचे स्वागत मोहन भुजाडे यांनी केले.
प्रस्तुत अभंगातून कीर्तनकारांनी सहा प्रकारच्या भक्तीचा उद्घोष केला. पाप, अज्ञान अहंकाराचं क्षालण करायचं असेल तर भगवंताच रूप पाहा, चरणांकित व्हा आणि लोटांगण घाला असा उपदेश त्यांनी केला. कीर्तन हे मनोरूजनाचं कार्य करते असे ते म्हणाले.
कीर्तनाच्या उत्तरार्धात चरणसेवेंच महत्त्व विषद करण्यासाठी रामायणातील केवट कथाभाग सादर केला. घेईन मी जन्म याजसाठी देवा।’ तुझी चरण सेवा साधावया ।। दास्य भक्तीचं अत्यंत समर्पक उदाहरण म्हणजे केवटाद्वारे भगवान श्रीरामाचे चरण प्रक्षालण करणे होय. क्षणार्धात ज्ञानातून विनोद व विनोदातून आंतरमुखकरणारं ज्ञान हे या कीर्तनाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.
पूजा समाप्तीचे वेळी घालीन लोटांगण वंदिन चरणं प्रत्येकजण गुणगुणतो अशा या केवळ दोन चरणाच्या अभंगात सुद्धा ब्रह्मांडीय ज्ञानाचं भांडार साठवलेलं आहे हे आम्हाला माहितच नव्हतं. अशी प्रतिक्रिया श्रोत्यांनी देणं हे या कीर्तनाचं वैशिष्ट्य ठरले. व्यवहार हा भक्तीचा व्यवहार नसून भक्तीचा शृंगार होता. अर्चन वंदन दास्य, सख्य, आत्मनिवेदन व पादसेवन या सहा विद्या भक्ती साध्य करून केवट रामरूप झाला, असे विधान करून त्यांनी आपल्या कीर्तनाची सांगता केली. आरतीचे यजमानपद दत्तात्रय घुडे, सदानंद देशपांडे, विनायक भिसे, सुधीर भोयटे, बन्सीलाल गोपलानी, अॅड. बदनोरे यांनी भूषविले. संचालनाने स्मिता भोयटे यांनी केले.