पराग मगर,
नागपूर,
Abhijit Bahadur : मानसिक तणाव हा कुणासाठीही आता नवीन राहिलेला नाही. स्त्री-पुरुष प्रत्येकच जण त्याचा सामना करतात व तो कमी करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्नही करीत असतात. विशेष म्हणजे जलरंगांच्या माध्यमातून चित्र काढताना स्त्रियांमधील मानसिक ताणतणाव कमी होत असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. नागपूरचे चित्रकार अभिजित बहादुरे यांनी त्यांच्या आर्ट स्टुडिओजच्या माध्यमातून याबाबत संशोधन केले असून सकारात्मक परिवर्तन घडून शांततेचा अनुभव महिलांना येत असल्याचेही संशोधनातून पुढे आले.

याविषयी चित्रकार अभिजित बहादुरे सांगतात, जलरंग चित्रकलेच्या कार्यशाळा घेताना सहभागींशी अनेकदा चर्चा होते. त्यावेळी चित्र काढताना ताण-तणावाचा कसा विसर पडतो, जीवनातील आनंद कसा सापडतो याविषयी अनेक जण भरभरून बोलायचे. आजही बोलतात. त्यामुळे याची माहिती संकलन करणे आवश्यक वाटले. यातूनच प्रश्नावली तयार करून ती भरून घेण्यास सुरुवात केली. ही कार्यशाळा ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होत असल्याने संपूर्ण भारतातून याला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे कार्यशाळेत स्त्रियांची संख्या अधिक असल्याने महिलांवर या कार्यशाळेचा कसा परिणाम होतो हे थेटपणे संशोधनातून पुढे आले.
संशोधनातील काही निरीक्षणे
-चित्रकलेचा लोकांच्या जीवनावर खूपच सकारात्मक परिणाम होतो.
-सर्जनशील क्षमतांमध्ये वाढ नोंदविली गेली.
-विद्यार्थी सभोवतालचे निरीक्षण करायला व अपूर्णता स्वीकारायला शिकले.
-आत्मविश्वास आणि संयम वाढला.
-निसर्गाशी सखोल संबंध वाढला.
-भावनांना मोकळी वाट मिळण्यास मदत.
संशोधनातील निष्कर्ष
२०२३ ते २५ दरम्यान सहभागी ८४ महिलांनी नोंदविलेल्या माहितीचे विश्लेषण केले असता या कार्यशाळेमुळे सकारात्मक परिणाम झाल्याचे ५८ टक्के महिलांनी मान्य केले, तर ३४ टक्के महिलांनी खूपच सकारात्मक परिणाम झाल्याचे नोंदविले.
ताणतणाव आणि चिंतेचे व्यवस्थापन करण्यात या कार्यशाळेमुळे मदत झाल्याचे मत ५२ टक्के महिलांनी, तर २० टक्के महिलांनी कार्यशाळेचा खूपच फायदा होत असल्याचे मत नोंदविले.
प्रतिक्रिया
कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांशी वेळोवेळी झालेल्या चर्चेतून सकारात्मक परिवर्तन होत असल्याची प्रतिक्रिया वारंवार मिळाल्याने या संधोधनाला बळ मिळाले. तसेच या डेटा सँपलिंगमुळे संधोधनाला एक बळकटी येण्यास मदत झाली. आपल्या कार्यशाळेमुळे खास करून महिला वर्गाला तणावातून मुक्तता मिळत असल्याचा मनापासून आनंद आहे
अभिजित बहादुरे
चित्रकार आणि संशोधक