'त्या' महिला होत्या म्हणून...

    दिनांक :13-Sep-2025
Total Views |
गेल्या पंधरवड्यात भारताचे दोन शेजारी अफगाणिस्तान आणि नेपाळ हादरले. भूकंपाने थरारला अफगाणिस्तान तर युवा आंदोलनाने दोलायमान भविष्याकडे वाटचाल करणारा नेपाळ! या दोन्ही देशांमधील महिलांची स्थिती मात्र विविध कारणांनी सारखीच राहिली. विज्ञानाधिष्ठ संस्कृती आणि बळकट संविधानाच्या जोरावर भारतीय महिला, एक व्यक्ती म्हणून जीवन जगत आहेत. धर्माच्या नावावर बोट ठेवून, महिलांचे शोषण करणा-या दोन विचित्र परंपरांचा उहापोह करण्याचा हा प्रयत्न!
Afghanistan earthquake and women's deaths चार वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात सत्तांतर झालं आणि लोकशाही रुजता-रुजता तालिबान्यांचं राज्य आलं. आता अफगाणिस्तान शरीयानुसार चालणार, हे जगजाहीर होतं. त्यात कथितपणे धर्मात सांगितलेल्या नियमांसोबत, मानवाच्या पाशवी वृत्तीने घातलेले निर्बंध होते. दुर्दैवाने नियमावलीचा 75 टक्के भाग केवळ महिला आणि मुलींसाठीच आहे. हिजाब-बुरखा घालण्यापासून एकटीने प्रवास न करण्यापर्यंतचे समाजाने धर्माच्या नावे घालून दिलेले नियम महिला पाळत आल्या. पण, गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानात आलेल्या भीषण भूकंपाने धर्माच्या रूढ मान्यतांनाही हादरे बसले. धर्माच्या नावाखाली माणूस किती कठोर होऊ शकतो? हे या नैसर्गिक आपत्तीनं दाखवून दिलं. पूर्व अफगाणिस्तानात 6 रिश्टर स्केलचा भूकंप आला, त्याचे आफ्टरशॉक्स अगदी कालपरवापर्यंत जाणवत होते. या भूकंपात आतापर्यंत 2,200 लोक मृत्युमुखी पडले असून, 3 हजारांवर जखमी आहेत. इमारती आणि बांधकामाचे ढिगारे जसजसे उपसले जात आहेत तसतसा मृतांचा आकडा वाढतो आहे. पण, यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या महिला-मुलींचा आकडा लक्षणीयरित्या जास्त आहे. यामागचे कारण भूकंप नाही तर तालिबानचा कायदा आहे.
 

Afghanistan earthqua 
 
 
तालिबानच्या कायद्यानुसार, परस्त्रीच्या शरीराला हात लावण्याची परवानगी पुरुषांना नाही. मग, ते सुरक्षा रक्षक असोत, डॉक्टर्स असोत किंवा आपत्ती व्यवस्थापनाचे जवान! ‘नो स्किन टच’च्या नियमामुळे, ढिगा-याखाली दबलेल्या पण जिवंत असलेल्या, गंभीर जखमी पण उपचारांच्या प्रतिक्षेत असलेल्या महिलांना कोणतीही प्राथमिक मदत देण्याचे सौजन्य दाखविण्यात आले नाही. तालिबान्यांची दहशत इतकी की, समोर दिसत असलेल्या जखमी आणि ढिगाèयांखाली फसलेल्या महिलांना काढण्याची माणुसकी कोणीही दाखवली नाही. त्यात मदतकार्य करणारे आणि डॉक्टर्स हे 90 टक्के पुरुष! उर्वरीत 10 टक्के महिला या परिचारीका आणि तुटपुंजे वैद्यकीय ज्ञान असलेल्या महिला!
 
 
महिलांना हात लावायचा नाही, स्पर्श करायचा नाही तर त्यांना ढिगा-याखालून काढणंही नाही आणि त्यांच्यावर उपचारही नाहीच. त्या जिवंत होत्या, मदतीसाठी ओरडत होत्या पण, त्यांना वाचविण्याची ‘धर्माची’ परवानगी नव्हती. रक्ताळलेल्या शरीरांकडे ही सगळी यंत्रणा स्त्री किंवा पुरुष म्हणून बघते, यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय! कोणता धर्म ही शिकवण देतो? 1 सप्टेंबरला भूकंप झाल्यानंतर, पूर्ण 36 तासांनी एक-दोन गावांमध्ये काही जखमी महिलांसाठी मदत घेऊन महिलाच पोहचल्या. तोपर्यंत मानेपर्यंत ढिगाèयात अडकलेल्या, रक्तबंबाळ महिलांमध्ये असलेली धुगधुगी विझून गेली होती. त्यांचे मृतदेह काढतानाही त्यांच्या अंगावरच्या कपड्यांना धरून खेचण्यात आले.
 
 
मृत्यूचे हे तांडव शांतपणे बघणारे कोणत्या धर्माचे पाईक म्हणावे? किमान ‘कॉमन सेन्स’ वापरायचा असतो, हे कोण सांगणार? जागतिक आरोग्य संघटनेने भूकंपानंतरची ही स्थिती हाताळण्यापुरते आपले नियम शिथिल करण्याचे आवाहन तालिबानला केले आहे. पण, त्यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. भूकंपादरम्यान आणि नंतर मिळून 11,600 गर्भवती महिलांचा जीव पणाला लागला आहे. आशिया खंडात अफगाणिस्तानमध्ये मातामृत्यू दर सर्वाधिक आहे, हे उल्लेखनीय! वर्ष 2022 मध्ये तालिबानने स्वयंसेवी संस्थांसाठी काम करणाèया महिलांना घराबाहेर पडून, समाजकार्य करण्यास मज्जाव केला होता. शिवाय, वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थिनींनाही घरी बसवलं आहे. त्यामुळे, महिला डॉक्टरांची संख्या नगण्य किंवा नसल्यासारखीच आहे. कधी काळी अखंड भारताचा भाग असलेल्या अफगाणिस्तानातील ही परिस्थिती, महिलांच्या दुर्दैवी शोषणावर विचारमंथनाचे निमित्त ठरली, हीदेखील शोकांतिकाच!
 
रेवती जोशी-अंधारे
9850339240