कारंजा (घा.),
stray dogs शहरातील मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून प्रभाग १६ मधील विशेषतः मटन मार्केट परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. या परिसरात तब्बल ३० ते ३५ कुत्र्यांचा झुंड कायम वावरत असल्याने नागरिकांसह वृद्ध, महिला आणि लहान मुलांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, नागरिकांनी मुख्याधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले. समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनातून दिला आहे.
२० रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभाग १६ मधील रिद्धी हिंगवे या ८ वर्षीय चिमुकलीला ५ ते ६ कुत्र्यांनी घेरून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तेथे उपस्थित नागरिकांनी कुत्र्यांना पिटाळून लावत चिमुकलीचा जीव वाचविला. यापूर्वीही या भागात अशा अनेक घटना घडल्या असून गेल्या तीन वर्षांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव सातत्याने वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
मटन मार्केट हे राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर व बसस्थानकाच्या अगदी जवळ असल्यामुळे प्रवासी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच पादचार्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.stray dogs मटन मार्केटमुळेच येथे कुत्र्यांची गर्दी वाढत आहे. दरम्यान, २२ रोजी प्रभाग १६ मधील नागरिकांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन चार दिवसात मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा तसेच एक महिन्याच्या आत मटन मार्केटचे स्थलांतर करावे, अशी मागणी केली आहे. समस्या लवकर न सुटल्यास आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
या संदर्भात नपं उपाध्यक्ष भगवान बुवाडे यांच्याशी संपर्क साधला असता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा झाली असून सध्या राष्ट्रीय महामार्गालगत असणारा कचरा डेपो लवकरच नियोजित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्या जागेवर बंदिस्त स्वरूपात मटन मार्केट स्थलांतरित करण्याची कारवाई सुरू आहे. हे स्थलांतर पूर्ण झाल्यानंतर मोकाट कुत्र्यांचा प्रश्न निकाली निघेल, असे त्यांनी स्पष्ट केले.