गडचिरोलीची नेहरू शाळा राज्यातील शाळांसाठी ‘दीपस्तंभ’

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
गडचिरोली,

Gadchiroli Nehru School राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राबविलेल्या पथदर्शी व नावीन्यपूर्ण प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून एक उत्कृष्ट शाळा ‘शैक्षणिक पर्यटन शाळा’ म्हणून निवडण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात गडचिरोली जिल्ह्यातून नगर परिषद गडचिरोली संचालित पीएम श्री जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा, रामनगर यांची निवड झाली आहे. जिल्ह्यातील ही शाळा आता संपूर्ण राज्यातील शैक्षणिक संस्थांसाठी दीपस्तंभ ठरणार आहे.
 

Gadchiroli Nehru School 
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचे उद्दिष्ट राज्यातील गुणवत्तापूर्ण आणि प्रेरणादायी शाळांची ओळख करून देणे, नावीन्यपूर्ण उपक्रमांचे प्रसारण करणे, तसेच इतर शाळांना सुधारणा आणि नवकल्पनांसाठी प्रोत्साहन मिळवून देणे हे आहे. जवाहरलाल नेहरू शाळेने आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्यामुळे, लोकसहभागातून उभारलेल्या सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाच्या अध्यापनाने राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही शाळा राज्यातील पहिली आयएसओ प्रमाणित शाळा असून मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत तिने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
शाळेत वाचनालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक व रोबोटिक्स प्रयोगशाळा, खगोलशास्त्र प्रयोगशाळा, परसबाग, प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती, इंटरअ‍ॅक्टिव पॅनेल, इंटरनेट सुविधा, क्रीडा प्रशिक्षण यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय स्वच्छ, आकर्षक व विद्यार्थीप्रिय वातावरणामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या या शाळेत पूर्वप्राथमिक ते इयत्ता 8 वीपर्यंत 1 हजार 46 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे पूर्वप्राथमिक वर्ग पूर्णपणे पालकांच्या लोकवर्गणीतून चालविले.
सहपालकमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी शाळेला भेट देऊन येथील उपक्रमांचे कौतुक केले आणि शाळेला आवश्यक ती मदत करण्याचे आश्‍वासन दिले. या निवडीमुळे आता राज्यभरातून शिक्षक, विद्यार्थी, पालक व अधिकारी या शाळेला भेट देऊन तिचे उपक्रम प्रत्यक्ष पाहतील आणि त्याचा लाभ त्यांच्या शाळांमध्ये घेतील. आजपर्यंत या शाळेला शेकडो शिक्षकांनी भेट दिली आहे.