गिरड,
Animals die in fire : समुद्रपूर तालुक्यातील हिरडी गावाशेजारी असलेल्या गोठ्याला आग लागली. या आगीत ६ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. यात गोठ्यासह शेतीपयोगी लाकडी साहित्य जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास हिरडी येथील प्रभाकर पाटेकर यांच्या गावाशेजारी असलेल्या गोठ्याला आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करून गोठ्याला कवेत घेतले. गोठ्यात बांधून असलेली गाय, वासरू आणि चार शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत लाकडी साहित्य व कडबा कुटार जळून खाक झाले. ही आग विझवण्यासाठी गावकर्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. हिंगणघाट येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. रात्री ९ वाजताच्या सुमारास लागलेल्या आगेवर जवळपास रात्री १ वाजता नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतु, तोपर्यंत गोठ्यासह जनावरं व सर्व साहित्य जळून खाक झाले.
ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. प्रभाकर पाटेकर यांचा सुतार व्यवसाय होता. ते आपला व्यवसाय या गोठ्यामध्येच करीत होते. त्यामुळे शेतीला लागणारे लाकडी साहित्य मोठ्या प्रमाणात साठवून होते. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर येथील पोलिस कर्मचारी, महसूल विभाग व महावितरण कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी प्रभाकर पाटेकर यांनी केली आहे.