नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या याद्या तीन दिवसात अपलोड करा : ना. भोयर

*अतिवृष्टी पीक नुकसानीचा आढावा

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
वर्धा, 
Pankaj Bhoyar : जिल्ह्यात पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून शेतकर्‍यांच्या याद्या २७ सप्टेंबरपर्यंत पोर्टलवर अपलोड करा आणि या शेतकर्‍यांची ई-केवायसीची प्रक्रिया गतीने पूर्ण करून मदतीचे वितरण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
 
 

BHOYAR 
 
 
 
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व मदत वाटपाचा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. राजेश बकाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूरवार, बांधकामचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे आदी उपस्थित होते.
 
 
नुकसानीचे पंचनामे करताना एकही शेतकरी सुटू नये. अधिकार्‍यांनी स्वत: फिल्डवर जाऊन पाहणी करणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांच्या खात्यांची विशेष मोहीम राबवून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. नुकसानग्रस्तांना आवश्यक निधी तातडीने देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन शेतकर्‍यांच्या खात्यात मदतीचा निधी पोहोचला पाहिजे, असेही ते म्हणाले. शेतकर्‍यांना वाटपासाठी ७ कोटी ७३ लाख इतका निधी प्राप्त झाला आहे. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीचे ७५ टके पंचनामे पूर्ण झाले आहे. त्यानुसार ३९ हजार ३१० शेतकर्‍यांचे २२ हजार ९६० हेटरवर नुकसान झाले आहे. यात अजून वाढ होण्याची शयता आहे. सर्व पंचनामे पूर्ण करून मदत वाटपाच्या पुढील कारवाईस गती देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
 
 
कृषी विभागाने सोयाबीनेच तातडीने सर्वे करावे. एकही नुकसानग्रस्त शेतकरी सर्वेतून सुटणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना ना. भोयर यांनी केल्या.
 
 
पालकमंत्री शेतकर्‍यांच्या बांधावर
 
 
ना. भोयर यांनी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली. सेलू तालुयातील सुरगाव, बाभुळगाव, क्षीरसमुद्र, आकोली येथे भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यात लवकरच मदतनिधी जमा होईल, असे आश्वासन ना. भोयर यांनी दिले.