वर्धा,
Fraud Case : जिल्हा प्रशासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत उघड झालेल्या लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आरोपी प्रतीक उमाटे आणि शेखर ताकसांडे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही पोलिसांना गुंगारा देत आहेत. दरम्यान, पोलिसांनी प्रतीक आणि शेखर यांचे बँक खातेच गोठवले असून या प्रकरणात आतापर्यंत तक्रारदारांसह सुमारे २१ जणांचे बयाण तपास अधिकार्यांनी नोंदविले आहे.

प्रकल्प प्रमुख प्रतीक उमाटे आणि अभियंता शेखर ताकसांडे यांनी विविध कारणे सांगून १६ व्हीएलईंकडून ऑफलाइन आणि ऑनलाइन १७.५६ लाख रुपये उकळले. त्यांनी जिल्हा प्रशासनाचीही फसवणूक केली. अप्पर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेत गठीत समितीने दोघांनाही दोषी ठरविले. हे प्रकरण फौजदारी कारवाईसाठी शहर पोलिसांकडे वळते करण्यात आले. पोलिसांनीही गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. तर दोन्ही बाजूचा युतिवाद लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांचा जामिन फेटाळला. आता पुन्हा शहर पोलिसांचे पथक दोन्ही आरोपींना अटक करण्यासाठी शोध घेत आहेत. प्रतीक उमाटे याचे एचडीएफसी आणि बँक ऑफ महाराष्ट्रमधील खाते गोठविण्यात आले आहे. तर शेखर ताकसांडे याच्या पत्नीच्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असलेले बँक खाते आणि पंजाब नॅशनल बँकेत शेखर यांच्या नावाने असलेले बँक खातेही गोठविण्यात आल्याची माहिती आहे.