वर्धा,
Kamgar Kalyan drama competition चंद्रपूर येथील बंगाली कॅम्प येथे १७ रोजी झालेल्या कामगार कल्याण महिला नाट्य स्पर्धेत नाट्यप्रतिक थिएटर अकॅडमी, वर्धा या संघाने आपल्या दमदार तयारी व अभिनय कौशल्याच्या जोरावर स्पर्धा गाजवली. या स्पर्धेत एकूण ९ पैकी तब्बल ८ पारितोषिके नाट्यप्रतीक संघाने पटकावत यशाची परंपरा राखली.
स्पर्धेत सादर झालेली सर्व तिन्ही नाटके दोन टके, विवर आणि मनाचा खेळ दिग्दर्शक प्रतीक सूर्यवंशी यांच्या दिग्दर्शनाखाली सादर करण्यात आली. यापैकी दोन टके आणि मनाचा खेळ ही नाटके प्रतीक सूर्यवंशी लिखित असून, विषयांच्या ताकदीमुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे ही नाटके विशेष ठरली.
या नाटकात आपल्या प्रभावी अभिनयासाठी सुविधा झोटिंग हिला प्रथम क्रमांक ‘सर्वोत्तम अभिनेत्री’ तर किरण हिवरे हिला द्वितीय क्रमांक ‘सर्वोत्तम अभिनेत्री’ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला. या तिन्ही नाटकांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
या यशामध्ये कामगार कल्याण केंद्र वर्धेच्या सुषमा ढाले यांचे मार्गदर्शन आणि संघाच्या विशेष सहकार्याचा मोलाचा वाटा राहिला. स्पर्धेत दोन टके नाटकाला प्रथम, विवरला द्वितीय, तर मनाचा खेळ या नाटकाला तृतीय क्रमांक मिळाला. या यशामुळे वर्धा संघाचे कलावंत, दिग्दर्शक प्रतीक सूर्यवंशी आणि मार्गदर्शक मंडळी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.