मुंबई,
Kantara Chapter 1 दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांच्या आगामी भव्य चित्रपट कांतारा: चैप्टर १’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक थक्क झाले असून, या कथानकात स्थानिक लोककथांचा आणि अध्यात्मिक ऊर्जेचा संगम पाहायला मिळतो. विशेष म्हणजे या चित्रपटाशी सुपरस्टार शाहरुख खान यांचाही अप्रत्यक्षपणे संबंध आहे.
चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिका साकारणारे ऋषभ शेट्टी एकाच वेळी तीन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असल्याने, या चित्रपटाला पूर्ण स्वरूप देण्यासाठी त्यांना काहीसा वेळ लागला. परंतु अखेर २ ऑक्टोबरला हा भव्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याच्या ट्रेलरने आधीच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हिंदी भाषिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी निर्मात्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्याकडून ट्रेलरसाठी खास गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे.या ट्रेलरला अभिनेता ऋतिक रोशनने लॉन्च केल्याने आणखी एक चर्चेचा मुद्दा समोर आला आहे. ऋतिक सध्या होम्बले फिल्म्सच्या आगामी प्रोजेक्ट्ससोबत संलग्न असून, त्याच पार्श्वभूमीवर ‘कांतारा: चैप्टर १’ च्या प्रमोशनचा काही भाग त्यांच्या खांद्यावर देण्यात आला. परंतु या चित्रपटाचा आणखी एक उल्लेखनीय पैलू म्हणजे त्याच्या व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी (VFX) शाहरुख खान यांच्या रेड चिलीज व्हीएफएक्स स्टुडिओने काम केले आहे.
ट्रेलर Kantara Chapter 1 प्रदर्शित होण्याच्या दिवशीच रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून चित्रपटाचा पोस्टर शेअर करण्यात आला. त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं – “लोककथा आणि जोश यांची एक अफाट गोष्ट, जी या मातीतूनच जन्मली आहे.” या पोस्टसोबत #RedChilliesVFX हा हॅशटॅग वापरण्यात आला होता, ज्यामुळे ही बाब स्पष्ट झाली की चित्रपटाच्या दृष्य प्रभावांसाठी रेड चिलीजचं तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे.शाहरुख खान आणि गौरी खान यांनी २००२ मध्ये रेड चिलीज एंटरटेनमेंटची स्थापना केली होती. २००६ मध्ये कंपनीने स्वतंत्र व्हीएफएक्स स्टुडिओ सुरू केला. त्यानंतर ‘शेहशाह’, ‘निशांची’, सलमान खानचा ‘सिकंदर’, कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ आणि ‘योद्धा’ अशा अनेक मोठ्या चित्रपटांच्या दृष्य प्रभावांवर रेड चिलीजने काम केलं आहे. ‘कांतारा: चैप्टर १’ ही या यादीतील नवीन आणि बहुप्रतिक्षित भर आहे.
दृश्य सौंदर्य, रहस्य आणि अध्यात्म यांचा संगम असलेल्या ‘कांतारा: चैप्टर १’ कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. यातील पारंपरिक कथेची सादरीकरण पद्धत, स्थानिक देवतांवरील श्रद्धा आणि भव्य दृश्य प्रभाव यामुळे हा चित्रपट हिंदी प्रेक्षकांसाठीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. आता प्रेक्षक २ ऑक्टोबरची आतुरतेने वाट पाहत आहेत, जेव्हा हा चित्रपट प्रत्यक्षात मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.