मुंबई,
lpg cylinder blast mumbai कांदिवलीतील मिलिटरी मार्गावरील ईएसआयसी रुग्णालयाच्या मागे असलेल्या राम किसन मेस्त्री चाळीत बुधवारी सकाळी सुमारास भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. एका छोट्या दुकानात एलपीजी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून झालेल्या गळतीमुळे ही आग लागली असून, यामध्ये सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहाजणांचे ७० ते ९० टक्के शरीर भाजले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
ही दुर्घटना बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. राम किसन मेस्त्री चाळीतील एका दुकानात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून गळती होत होती. यावेळी अचानक आगीचा भडका उडाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच दुकानातील वस्तूंनी पेट घेतला आणि आग पसरू लागली. विजेच्या तारा व विद्युत यंत्रणा यांमुळे आग अधिकच भडकली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तत्काळ मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले. जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत काही नागरिक आगीत होरपळले होते. या दुर्घटनेत शिवानी गांधी (५१), नीतू गुप्ता (३१), जानकी गुप्ता (३९), मनराम (५५), रेखा जोशी (४७), दुर्गा गुप्ता (३०) आणि पुनम (२८) हे सातजण जखमी झाले.
जखमींपैकी lpg cylinder blast mumbai शिवानी गांधी, नीतू गुप्ता, जानकी गुप्ता आणि मनराम यांना तातडीने जवळील ईएसआयसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर उर्वरित रेखा जोशी, दुर्गा गुप्ता आणि पुनम यांना बीडीबीए रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सर्वांना प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.सध्या जखमींपैकी सहाजणांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू आहेत. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी मोठे वित्तहानी झाल्याचा अंदाज आहे. स्थानिक पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून घटनेच्या तपासासाठी चौकशी सुरू असून गॅस गळतीची नेमकी कारणमीमांसा केली जात आहे.ही दुर्घटना पुन्हा एकदा घरगुती आणि व्यावसायिक ठिकाणी गॅस सिलिंडर वापरताना आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे महत्व अधोरेखित करते. स्थानिक प्रशासनाने अशा दुर्घटना टाळण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.