6 जहाल माओवाद्यांचे पोलिस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण

62 लाखांचे होते बक्षिस

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
गडचिरोली,
Maoist surrender Gadchiroli शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून आज राज्याचे पोलिस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्यासमोर 6 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
 

Maoist surrender Gadchiroli 
राज्याच्या पोलिस Maoist surrender Gadchiroli महासंचालक रश्मि शुक्ला यांच्यासह अपर पोलिस महासंचालक डॉ. छेरिंग दोरजे हे आज गडचिरोली जिल्हा दौर्‍यावर होते. यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे (डिव्हीसीएम, उत्तर बस्तर डिव्हीजन मास टिम) (58) रा. करंचा ता. अहेरी, विमलक्का ऊर्फ शंकरअक्का विस्तारय्या सडमेक(56) रा. मांड्रा, ता. अहेरी, कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जी (34) रा. पडतानपल्ली, ता. भामरागड, नागेश ऊर्फ आयताल गुड्डी माडवी (39) रा. पामरा, ता. भैरामगड, जि. बीजापूर (छ.ग.), समीर आयतू पोटाम, (24) रा. पुसणार, ता. गंगालूर, जि. बीजापूर (छ.ग.), नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी (28) रा. नैनेर, ता. अहेरी, जि. गडचिरोली या माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
 
 
विशेष म्हणजे, 1 जानेवारी रोजी दंडकारण्य स्पेशन झोनल कमिटीची सदस्य ताराक्का सिडाम हिच्यासह एकूण 11 जहाल माओवाद्यांनी तर 6 जून रोजी डिव्हीसीएम सपनाक्का बुचय्या चौधरीसह एकुण 12 जहाल माओवाद्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विभागातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. पोलिस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे आयोजित कार्यक्रमात कवंडे जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये 1 दलम कमांडरसह 4 कट्टर माओवाद्यांना खात्मा करण्यात आला होता. 27 ऑगस्ट रोजी कोपर्शी-फुलनार जंगल परिसरात 4 माओवाद्यांना तसेच 17 सप्टेंबर रोजी मोडस्के जंगल परिसरात 1 कमांडरसह 2 जहाल महिला माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आला होता. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या या तिनही अभियानात सहभागी विशेष अभियान पथकातील अधिकारी व जवानांचा पोलिस महासंचालक यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
 
 
यासोबतच अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश आणि अपर पोलिस अधीक्षक श्री. सत्य साई कार्तिक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच कापेवंचा येथील रावजी चिन्ना आत्राम तसेच कियर येथील सुखराम महागु मडावी यांची माओवाद्यांनी पोलीसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन हत्या केली होती. या दोन्ही मयत नागरिकांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे धनादेश वितरण करण्यात आले.
यावेळी अपर पोलीस महासंचालक डॉ.छेरिंग दोरजे, विशेष पोलिस महानिरीक्षक संदिप पाटील, उप-महानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश,अपर पोलिस अधीक्षक श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलिस अधीक्षक गोकुल राज जी, उप-कमांडंट सुमित वर्मा, सहाय्यक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे, पोलिस उप-अधीक्षक विशाल नागरगोजे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष अभियान पथक, पोलिस मुख्यालय तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांनीपरिश्रम घेतले.
 
 
शासनाने जाहीर केले बक्षिस
 
 
महाराष्ट्र शासनाने भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे याच्यावर 16 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते. विमलक्का ऊर्फ शंकरअक्का विस्तारय्या सडमेक हिच्यावर 16 लाख रूपये, कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जी हिच्यावर 8 लाख रूपये, नागेश ऊर्फ आयताल गुड्डी माडवी याच्यावर 8 लाख रूपये, समीर आयतू पोटाम याच्यावर 8 लाख रूपये तर नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी हिच्यावर 6 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते. आत्मसमर्पणानंतर शासनाकडुन भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे याला 8.5 लाख रुपये, विमलक्का ऊर्फ शंकरअक्का विस्तारय्या सडमेक हिला 8.5 लाख रुपये, कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जी हिला एकुण 5.5 लाख रुपये, नागेश ऊर्फ आयताल गुड्डी माडवी याला 5 लाख रुपये, समीर आयतू पोटाम याला 4.5 लाख रुपये तर नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी हिला 4.5 लाख रुपयांचे बक्षीस जाहिर केले आहे.
 
 
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता राज्य शासनाकडुन पती पत्नी असलेले नक्षल सदस्य यांनी आत्मसमर्पण केल्यास एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून 1.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.