वर्धा,
Liquor Sale : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नालवाडी येथील एका फ्लॅटमध्ये धाड टाकून देशी-विदेशी दारूसाठा, दोन कार, एक दुचाकी असा २७ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ५ दारू तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई मंगळवार २३ रोजी करण्यात आली.

पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी दारू तस्करी करणार्यांवर धडक कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी व त्यांच्या पथकाने वर्धा शहर परिसरात गस्तीवर असताना दारू तस्कर शाहरूख जलील बेग रा. राणी दुर्गावतीनगर बुरड मोहल्ला याचे नालवाडी येथील भाड्याच्या फ्लॅटवर छापा टाकला. तिथे मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू व बिअर मिळून आली. शाहरूख बेग याला दारूबाबत विचारणा केली असता. त्याने मनोज मसराम, बबलू कोडापे, विष्णू गेडाम, साहील पेंदाम सर्व रा. बुरड मोहल्ला यांच्यासह नागपूर येथील वासन वाईन शॉप येथून दारू खरेदी केल्याचे सांगितले. तसेच शाहरूख बेग हा एका अल्पवयीन मुलास दारूविक्री व्यवसाय करवून घेत असल्याचे निष्पन्न झाले. दारू तस्करी आणि अवैध विक्रीकरिता फ्लॅटचा मालक अजय घुरडे रा. वार्ड ६ याने त्याच्या मालकीचा फ्लॅट उपलब्ध करून दिला. त्यांच्या ताब्यातून देशी-विदेशी दारू, बिअर, एम. एच. ३२ ए. एस. ३३९७ आणि एम. एच. ३२ ए. एस. २४१८ या क्रमांकाच्या कार, एम. एच. ३२ ए. एल. ६२४३ क्रमांकाची दुचाकी, असा २७ लाख ६७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, प्रकाश लसुंते, पोलिस अमंलदार मनोज धात्रक, अरविंद येनूरकर, हमीद शेख, अमर लाखे, रोशन निंबोळकर, महादेव सानप, पवन पन्नासे, अमरदीप पाटील, रवी पुरोहित, अक्षय राऊत, अखिल इंगळे, विनोद कापसे, अभिषेक नाईक यांनी केली आहे.