पराग मगर
नागपूर,
S. L. Bhairappa : प्रसिद्ध कादंबरीकार, लेखक, तत्वज्ञ, पद्म भूषण डाॅ. एस. एल. भैरप्पा यांच्या निधनाने आज ‘भैरप्पा पर्व’ संपले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या वर्षी 2024 मध्ये हिंदू रिसर्च फाऊंडेशन, नागपूरद्वारे सप्तर्षी पुरस्कारांतर्गत त्यांना महर्षी वाल्मिकी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हाेते. यासाठी ते खास नागपूरला आले हाेते. यावेळी त्यांचे ‘मी वाल्मिकीच्या लेखणीचा पाईक’ हे शब्दही नागपूरकरांसाठी कदाचित शेवटचे ठरले.
सौजन्य: प्रा. डॉ. सावन धर्मपुरीवार
एस. एस. भैरप्पा हे नागपूरला दाेन किंवा तीन वेळाच आले. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. रवींद्र शाेभणे हे विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष असताना 2022 मध्ये त्यांनी डाॅ. भैरप्पा यांची खास मुलाखत आयाेजित केली हाेती. त्यांच्या कन्नड कादंबऱ्यांचा अनुवाद करणाऱ्या उमा कुळकर्णी यांनीच ती मुलाखत घेतली हाेती. ही मुलाखत आणि कार्यक्रम खूप गाजला हाेता. त्यानंतर 2024 मध्ये हिंदू रिसर्च फाऊंडेशनद्वारे महर्षी वाल्मिकी पुरस्कारासाठी ते नागपूरला आले हाेते. हीच त्यांची नागपूरची शेवटची भेट ठरली. यावेळी त्यांनी नागपूच्या काही स्थळांना भेटीही दिल्या हाेत्या.
मंद्र कादंबरीतील नागपूरचा उल्लेख काल्पनिक
भैरप्पा यांच्या मंद्र कादंबरीला 2011 साली सरस्वती पुरस्कार मिळाला हाेता. या कादंबरीत त्यांनी नागपूर शहरातील एका भागाचे वर्णन केले हाेते. वि. सा. संघातील मुलाखतीत त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी मी त्या कादंबरीपूर्वी नागपूरला आलेलाे नव्हताे आणि ते वर्णनही मी काल्पनिक केल्याचे त्यांनी यावेळी प्रांजळपणे कबूल केले हाेते.
कालिदास स्मारक पाहून झाले हाेते व्यथित
21 ऑक्टाेबर 2024 मध्ये सप्तर्षी पुरस्कारातर्गत महर्षी वाल्मिकी पुरस्कार स्वीकारण्यासाठी नागपुरात आले असता त्यांनी रामटेकमधील रामगिरीवरील महाकवी कालिदास स्मारकाला अतिशय श्रद्धेने भेट दिली. प्रा. सावन धर्मपुरीवार, लेखक चैतन्य देशपांडे त्यांच्या साबत हाेते. येथील नैसर्गिक साैंदर्य पाहून ते भारावले. परंतु स्मारक परिसराची दुरवस्था, वाढलेले गवत आणि अव्यवस्था पाहून ते व्यथित झाले हाेते.
डाॅ. भैरप्पा यांनी भारतीय कादंबरीला नवा आयाम दिला. ते ज्ञानपीठ सन्मानाचे दावेदार हाेते. परंतु कन्नड साहित्यातील कंपूशाहीमुळे त्यांना ताे पुरस्कार मिळू शकला नाही. एक कादंबरीकार आणि अध्यापक म्हणून मी त्यांच्या जवळपास सर्वच कादंबऱ्या वाचल्या आहेत. विदर्भ साहित्य संघात मी कार्याध्यक्ष असताना त्यांची आयाेजित केलेली मुलाखत माझ्यासाठी आजही स्मरणीय आहे.
-डाॅ. रवींद्र शाेभणे
माजी अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य संमेलन
पद्म भूषण ने सन्मानित कन्नड भाषिक कादंबरीकार, एस एल भैरप्पा मराठीत विशेष लाेकप्रिय हाेते. त्यांच्या कादंबèयांचे अन्य भारतीय भाषांप्रमाणेच मराठीतही भरपूर अनुवाद झाले. विशेषत: त्यांच्या पर्व’, वंशवृक्ष’ सारख्या कादंबऱ्यांनी मराठी वाचकाला झपाटून टाकले हाेते. फार वर्षांपूर्वी विदर्भ साहित्य संघात त्यांना आम्ही बाेलावले हाेते. तेव्हा त्यांच्या भेटीचा, त्यांच्याशी संवादाचा याेग आला हाेता. भारतीय साहित्यातील एक दैदीप्यमान तारा त्यांच्या निधनाने निखळला आहे.
- श्रीपाद भालचंद्र जाेशी
संयाेजक, मराठीच्या व्यापक हितासाठी