लडाख आंदोलनाला हिंसक वळण, विद्यार्थ्यांचा एल्गार!

भाजपा कार्यालय जाळले

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
लेह,
ladakh violence लडाखला केंद्रशासित प्रदेशाऐवजी राज्याचा दर्जा द्यावा, तसेच सहाव्या अनुसूचित भागात समावेश करावा या मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेलं आंदोलन बुधवारी हिंसक बनलं. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाने लेहमध्ये मोठा उद्रेक घेतला असून, संतप्त जमावाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक करत ते पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली.
 
 

ladakh violence  
सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली लडाखमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला दिवसेंदिवस उग्र स्वरूप येत आहे. वांगचुक गेले १५ दिवसांपासून बेमुदत उपोषणावर आहेत. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले असून, शांततेच्या मार्गाने चाललेल्या या चळवळीने बुधवारी हिंसक वळण घेतले. पोलिस आणि आंदोलकांमध्ये ठिकठिकाणी झडप झाली. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, तर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला.या आंदोलनाच्या केंद्रस्थानी चार प्रमुख मागण्या आहेत. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, राज्याचा सहाव्या अनुसूचीत समावेश करावा, कारगिल व लेह हे दोन वेगवेगळे लोकसभा मतदारसंघ म्हणून घोषित करावेत आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावं, या मागण्यांवर आंदोलक ठाम आहेत.
 
 
५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवला आणि त्याचे दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश बनवले – जम्मू-काश्मीर आणि लडाख. त्या वेळेपासून लडाखमधील नागरिकांकडून आपली जमीन, संस्कृती आणि संसाधनांच्या संरक्षणासाठी राज्याचा दर्जा आणि संवैधानिक सुरक्षा याची मागणी सातत्याने होत आहे.
 
 
अलीकडच्या ladakh violence घडामोडींमध्ये या मागण्यांनी उग्र रूप घेतलं असून, आंदोलकांच्या रोषाचा केंद्रबिंदू भाजपा आणि केंद्र सरकार बनले आहेत. लेहमध्ये झालेल्या हिंसक घटनेमुळे वातावरण चिघळले असून, प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार आणि लडाखमधील प्रतिनिधी यांच्यात ६ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत लेह अ‍ॅपेक्स बॉडी (एलएबी) आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स (केडीए) या प्रमुख संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
 
 
कारगिल डेमोक्रेटिक फ्रंटचे नेते सज्जाद कारगिल यांनी एक्स (माजी ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “लेहमध्ये जे घडतंय ते दुर्दैवी आहे. लडाख हे शांतताप्रिय भूभाग आहे, पण केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे येथील लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावली आहे. सरकारने आंदोलकांशी चर्चा करावी आणि त्यांच्या मागण्या मान्य करून लडाखला राज्याचा दर्जा द्यावा.”सध्या लडाखमध्ये निर्माण झालेलं अस्थिर वातावरण पाहता, येत्या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. या चर्चांमधून आंदोलनाचा तोडगा निघतो की आंदोलन आणखी तीव्र होतं, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.