वर्धा,
surya ghar yojana विजेच्या वाढत्या दरांनी त्रस्त झालेल्या विदर्भातील नागरिकांसाठी ‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज’ योजना क्रांती ठरली आहे. विदर्भातील १ लाख १४ हजार ९७८ कुटुंबांनी या योजनेत सहभाग घेऊन त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसवले असून नागपूर, अमरावती, बुलढाण्यानंतर विदर्भात वर्धा जिल्हा या योजनेचा लाभ घेणारा चौथ्या स्थानी आहे. केंद्र सरकारने या योजनेसाठी भरीव अनुदान दिले आहे. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ३० हजार, दोन किलोवॅटसाठी ६० हजार आणि तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होते. त्यामुळे सुरुवातीचा खर्च सहज सोयीचा होतो. प्रत्येक कुटुंबाला दरमहा ३०० युनिटपर्यंत वीज मोफत मिळावी, हा या योजनेचा उद्देश आहे.

गरजेपेक्षा जास्त वीज तयार झाली तर ती अतिरित वीज महावितरणला विकून तुम्ही पैसेही कमवू शकता. एकाच वेळी बचत आणि कमाई असा हा दुहेरी फायदा आहे. विदर्भात या योजनेला मोठा प्रतिसाद वाढत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत या योजनेत सहभागी झालेल्या २ लाख ८९ हजार १७२ ग्राहकांपैकी एकट्या विदर्भातील १ लाख १४ हजार ९७८ ग्राहकांनी या योजनेचा स्वीकार केला आहे. यात नागपूर जिल्ह्यात ४४ हजार २६८ घरांवर सौर पॅनेल बसवण्यात आले आहेत.surya ghar yojana त्यापाठोपाठ अमरावती १७ हजार ६७, बुलढाणा ८ हजार ८४९, वर्धा ८ हजार ६२१, अकोला ८ हजार ३३९, चंद्रपूर ७ हजार ४३६, यवतमाळ ७ हजार १२, भंडारा ४ हजार ८४४, वाशिम ३ हजार ५८४, गोंदिया ३ हजार ४०४ आणि गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ५५४ ग्राहकांनी या योजनेला प्रतिसाद दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या सेवा पंधरवड्यात महावितरणने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली असल्याचे नागपूर महावितरणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी कळविले आहे.