वर्धा,
Wardha News : जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक नागरिक जखमी आणि काहींचा मृत्यूही झाला. काही प्रमाणात पशुधन जखमी झाले. अनेक घरे जमीनदोस्त झाली तर अंशत: शेडची पडझड झाली. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बाधित नागरिक आणि शेतकर्यांच्या मदतीसाठी सरकारच्या वतीने ७ कोटी ७३ लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून लवकरच शेतकर्यांच्या खात्यात ही नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे.

यावर्षी मान्सून पूर्वीच जिल्ह्यात पाऊस पडला. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. जूनमध्ये १२३.४ मिमी पाऊस पडला, जो एकूण पावसाच्या ७०.९ टके होता. जुलैमध्ये ३१ विभागांमध्ये ३४१.९ मिमी, ऑगस्टमध्ये ४६ विभागांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. या महिन्यात २५४.५ मिमी (९३.७ टके) पाऊस पडला. सप्टेंबरमध्ये ४८ विभागांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून २४०.६ मिमी (२०२.२ टके) पाऊस पडला. जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे १२ हजार ७५५ शेतकर्यांच्या ९ हजार ९० हेटरवरील पिके नष्ट झाली. शेतातील नुकसानीची यादी तयार करून मदतीसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. नुकसान भरपाईची जिल्हा प्रशासनाला ७ कोटी ७५ लाखांचा निधी मिळाला आहे. हा निधी शेतकर्यांना तात्काळ वितरित केला जाईल.
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ३२३ शेतकर्यांची १७०.५ हेटर जमीन पिकांसह वाहून गेली. मदतीसाठी ७६ लाख ५१ हजार ६०० रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला. हा निधी लवकरच सरकारकडून प्राप्त होणार आहे. पिकांच्या नुकसानीसाठी सरकारकडून निधी प्राप्त झाला आहे. बाधित शेतकर्यांची यादी अपलोड करण्याचे काम सुरू आहे. सप्टेंबरमध्ये ३९ हजार ३१० शेतकर्यांच्या २२ हजार ९६०.४० हेटरवरील पिकांचे नुकसान झाले. पंचनाम्याचे काम ७५ टके पूर्ण झाले आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाणार असून निधी प्राप्त होताच मदतही दिली जाणार आहे.