गिरड,
Samudrapur Vighnaharta : राज्य सरकारकडून उत्कृष्ट गणेश उत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा समुद्रपूर येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला असून उद्या गुरुवार २५ रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उत्कृष्ट गणेश उत्सव मंडळाचा बहुमान प्राप्त होणार आहे.
समुद्रपूर हे तहसील स्तरावरील शहर असूनसुद्धा या ठिकाणी एक गाव, एक गणपतीची संकल्पना अबाधित आहे. समुद्रपूरचे गणेश मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहे. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव साजरा करण्याची धुरा या मंडळाने हाती घेतलेली आहे. विविध जाती-धर्माचे लोक एकत्र आणण्याचे काम धर्मनिरपेक्ष समाज घडवण्याचे काम या मंडळाद्वारे केले जाते. आजतागायत महाराष्ट्र शासनाकडून जितया स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या सर्व स्पर्धेमध्ये समुद्रपूर येथील गणेश मंडळाने विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. समुद्रपूरच्या विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने तसेच समुद्रपूर वासीयांच्या सहकार्याने इतर बलाढ्य मंडळाला लाजवेल असे काम समुद्रपूरच्या गणेश मंडळाने मुंबईच्या ततावर नोंदविले आहे.